विश्वास पवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाई : ‘मधाचे गाव’ म्हणून मांघर घोषित करण्यात आल्यानंतर गावाबाबत सर्वत्र आकर्षण निर्माण झाले. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यांतदेखील असे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. मधमाश्या पालन उद्योग शेती सुसंगत असा प्रमुख उद्योग असल्याने या प्रकल्पास चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळ प्रयत्न करत आहे.

मांघर (ता. महाबळेश्वर) गावाची ओळख आता भारतातील मधमाश्यांचे पालन करणारे आणि मध उत्पादित करणारे पहिले गाव म्हणून झाली आहे. मधमाश्या संवर्धनासोबत निसर्ग संवर्धनासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. या परिसराचा मध उत्पादनामुळे झालेला विकास पाहून या विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शू सिन्हा यांनी मधाचे गाव ही संकल्पना मांडली. आता ती प्रत्यक्षात उतरत आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई व आमदार मकरंद पाटील यांनी या उपक्रमाचे मागील आठवडय़ात उद्घाटन केले.

मधात जो गोडवा असतो तो मुख्यत: ग्लुकोज़्‍ा आणि एकलशर्करा फ्रक्टोजमुळे असते. मधाचा प्रयोग औषधी रूपातही होतो. यात ग्लुकोज व अन्य शर्करा तसेच विटामिन, खनिज आणि अमीनो आम्ल पण असतात. अस्सल मध चाखल्यानंतर जिभेवर त्या मधाचा गोडवा फक्त पंधरा सेकंदांत नष्ट होतो, तर साखरेचा पाक अथवा कृत्रिम मध यांचा जिभेवरील गोडवा पंधरा मिनिटे टिकून राहतो. मधाला आयर्वेदात अतिशय महत्त्व आहे. शरीरातला उपयुक्त घटक असणारा मध शक्तिदायक आणि पौष्टिक अन्न व औषध आहे. मधमाश्या पालनपासून मधाबरोबर मिळणाऱ्या मेणाचा उपयोग सौंदर्यप्रसाधने, औषधे, चर्चमधील मेणबत्त्या तयार करण्यासाठी होतो. मधमाश्यांच्या परागीभवनामुळे शेती पीक उत्पादनात वाढ होते.

मधमाश्या हा मध जांभूळ, ओवा, करंज, कारवी, निलगिरी, मोहरी, लिची, शेवगा, सूर्यफूल, हिरडा-गेळा, ओमरेंदा इत्यादी वनस्पतींच्या फुलोऱ्यांतून गोळा करतात. महाबळेश्वरात यांपैकी जांभळाचा मध विपुल प्रमाणात मिळतो. चाफा, जाई, जुई, मोगरा, कमळ, गुलाब ही काही फुलं आहेत. मधमाश्यांचा विकास व विस्तार व्हावा, या उद्देशाने १९५७ साली मध संचालनालयाची स्थापना महाबळेश्वरला करण्यात आली आहे. मधमाश्यांची संख्या वाढावी, तसेच त्यांचा सकारात्मक प्रसार व्हावा, कृषी पर्यटनाच्या धर्तीवर मधुपर्यटन ही संकल्पना रुजावी, यासाठी संचालनालय झटत आहे.

या गावात मधमाश्यांचे संरक्षण व संवर्धन याबरोबरच डोंगराळ व जंगली भागांत राहाणाऱ्या ग्रामस्थांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक म्हणून मधमाश्यांकडे पाहिले जाते. मधमाश्यांमुळे पिकांच्या उत्पादनातही मोठय़ा प्रमाणात वाढ होते. अशा उपक्रमातून गावे स्वयंपूर्ण होतील. त्या गावातील ग्रामस्थांना मधाच्या पेटय़ांचे वाटपही करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात पसरलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा शेती, परिसरात असणारी फुलोरी झाडे, फळबागा मधमाश्या पालनाला पूरक आहेत. मधमाश्या पालन व्यवसाय हा शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय व्हावा यासाठी खादी ग्रामोद्योग विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील ३१ जिल्ह्यांत १८५ तालुक्यांतील पाच हजार १०३ पेक्षा अधिक गावांत शेतकरी मधमाश्या पालन करतात. मधमाश्या पालनातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होत आहे. मधमाश्या पालनामुळे वनसंपदा निसर्ग आणि पर्यावरणाचे संवर्धन व जतन होत असते. त्यादृष्टीने मधमाशी केवळ मध देत नाही तर तिने केलेल्या परागीकरण यामुळे पीक उत्पादन वाढते. शिवाय उत्पादनाची प्रत सुधारते. डोंगरदऱ्यातील शेतकऱ्यांनी शेतीबरोबर उत्पन्नाचे प्रमुख स्रोत म्हणून मधमाश्या पालन यासारख्या प्रमुख व्यवसायाची निवड केली आहे. पश्चिम घाटातील डोंगरदऱ्या आणि आता दुर्गम भागात असणाऱ्या लोकांना मधमाश्या पालन हा उद्योग करण्यास मोठा वाव आहे. मधउत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देत आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई व कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, भुदरगड, आजरा या तालुक्यांतील शेतकरी मधमाश्या पालन व मध संकलन करत आहेत.

मांघरमध्ये काय आहे?

ग्रामस्थ १९४८ पासून शेतीला जोड धंदा म्हणून मध उत्पादन करतात. खादी ग्रामोद्योग समितीमार्फत हे काम चालते. गावातील ८५ टक्के ग्रामस्थ मध उत्पादनाचा व्यवसाय करतात. या गावात ३८०० मध पेटय़ा आहेत. त्या शेतात अथवा जंगलात ठेवल्या जातात. घरटी किमान पाच ते आठ मध पेटय़ा आहेत. प्रत्येक मधपेटी दर आठ ते दहा दिवसांनी परिपक्व होते आणि त्याच्यातून सात ते आठ किलो मध मिळतो. महाबळेश्वर येथे होणाऱ्या मध उत्पादनातील २० टक्के मध उत्पादन मांघरमध्ये केले जाते. प्रत्येक मतपेटी वर्षांला तीस ते पस्तीस किलो मध उत्पादन करते. महाबळेश्वरमध्ये उत्पादित होणारा मध, मधुसागर मधोत्पादन संस्थेस विकला जातो. या मध्ये मांघरचा वाटा पाच हजार किलोचा आहे. प्रत्येक मधपेटीत १५ ते २० हजार मधमाशा असतात. जंगलात ठेवलेल्या मधपेटय़ांना प्लास्टिकचा कागद आच्छादून थोडा अंधार केला जातो. कारण मधमाशा अंधाऱ्या जागेतच मध संकलन करतात. महाबळेश्वर येथील घनदाट जंगलामुळे येथे जांभूळ घेरा, हिरडा, पिसा, वायसी, कारवी अशा असंख्य आयुर्वेदिक वनौषधी वनस्पती आढळून येतात. जानेवारी फेब्रुवारी मध्ये जांभळाला, मे महिन्यात घेरा तर सात वर्षांतून एकदाच कारविला तसेच वेगवेगळय़ा हंगामात वेगवेगळय़ा वनस्पतींना फुले येतात. मधमाशा त्यातून मध संकलित करतात. यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा आणि बोनस ही मिळतो. याशिवाय खादी ग्रामोद्योग आणि कृषी विभागाकडून सबसिडी आणि मध पेटय़ा ही मिळतात.

मधुसागर मधोत्पादन सहकारी संस्था ही राज्यातील एकमेव नैसर्गिक मध संकलन-विक्री करणारी सहकारी संस्था आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र ११० गावांत आहे. १७०० सभासदांपैकी ६०० मध उत्पादक आहेत. १९५५ मध्ये स्थापन झालेली ही संस्था अ वर्गात आहे. संस्था दरवर्षी ३६ हजार किलो रसायन विरहित मध संकलित करते. संस्थेची तीन कोटी रुपयांची उलाढाल आहे. 

– संजय गायकवाड,

अध्यक्ष, मधुसागर मधोत्पादन सहकारी संस्था, महाबळेश्वर

साताऱ्याचा सन्मान

साताऱ्यात मिलिटरी अपिशगे हे सैनिकांचे गाव, भिलार (ता. महाबळेश्वर) हे पुस्तकांचे गाव तर आता मांघर मधमाशांचे पालन करणारे आणि मध उत्पादित करणारे पहिले गाव म्हणून ओळखले जाणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manghar first honey village country village charm construction first project ysh
First published on: 27-05-2022 at 00:02 IST