scorecardresearch

आंबा खाण्यास घातक?

आंबे पूर्णपणे नैसर्गिक आणि खाण्यास सुरक्षित आहेत का, हा प्रश्न निर्माण झाला आहे

Alphonso mangoes
हापूस आंबा

फळ पिकविण्यासाठी इथेफॉन रसायनाचा मारा 

नवी मुंबई : हापूस आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडला पर्याय म्हणून तीन वर्षांपूर्वी वापरण्यास परवानगी देण्यात आलेल्या इथिलिन फवारणीतही इथेफॉन नावाच्या घातक रसायनाचा ३९ टक्के अंश आढळून आल्यामुळे ऐन हंगामामध्ये दारात आणि दुकानांत विकले जाणारे आंबे पूर्णपणे नैसर्गिक आणि खाण्यास सुरक्षित आहेत का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.  अन्न व औषध विभागाने मंगळवारी तुर्भे येथील एपीएमसीच्या फळ बाजारातून  हापूस आंबे तपासणीसाठी ताब्यात घेतले असून त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.  हापूस आंबा झटपट पिकविण्यासाठी यापूर्वी कॅल्शियम कार्बाइडच्या भुकटीचा सर्रास वापर होत होता. जागतिक आरोग्य संस्थेने फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर आधीच बंदी घातली आहे. तरीही भारत आणि पाकिस्तानात या घातक रसायनाचा वापर फळे विशेषत: हापूस आंबा पिकविण्यासाठी केला जात होता. राज्य सरकराने तीन वर्षांपूर्वी कॅल्शियम कार्बाइडवर पूर्णपणे बंदी घालून या रसायनाचा वापर करणाऱ्यावर दंड व शिक्षेची तरतूद केली आहे. ती घालताना सरकारने कॅल्शियम कार्बाइडला पर्याय म्हणून इथिलिन रसायनाच्या फवारणीला परवानगी दिली होती. घाऊक बाजारात बडय़ा व्यापाऱ्यांनी आंबा पिकविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे हे व्यापारी त्यांच्याकडे आलेल्या हापूस आंब्यावर इथिलिन गॅस चेंबर मध्ये हापूस आंबा पिकण्याची प्रक्रिया करीत आहेत. सर्वसामान्य व्यापाऱ्यांसाठी एपीएमसीने एक चेंबर सुरु केला होता. त्यात मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या हापूस आंब्यावर प्रक्रिया  शक्य नाही. तोही कालांतराने आता बंद पडला आहे.

वैयक्तिक रायपलिंग चेंबर उभारणे शक्य नाही आणि एपीएमसी चेंबर उभारण्यास हतबल आहे. त्यामुळे छोटय़ा व्यापाऱ्यांची पंचाईत झाली आहे. याला पर्याय म्हणून इथिलिन वापरुन फळे पिकविण्यासाठी बेथिलीन नावाचे एका बडय़ा खत निर्मिती करणाऱ्या कंपनीचे रसायन वापरले जात आहे.  कर्नाटक, तामिलळनाडू, केरळच्या हापूस आंबा पेटीत ही बेथिलिन फवारणी मोठय़ा प्रमाणात होत आहे. केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा प्रधिकरणाने १३ मार्च रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार या बेथिलिन व इथिलिन फवारणीत वापरण्यात येणारे इथेफॉन नावाचे रसायन कॅल्शियम कार्बाइड एवढेच घातक असल्याने त्यावर बंदी घातली आहे. तरीही गेला दीड महिना तुर्भे घाऊक बाजारात हापूस आंबा पिकविण्यासाठी  इथिलिनची फवारणी खुलेआम होत आहे. त्यामुळे अन्न व औषध विभागाच्या तीन पथकांनी मंगळवारी एपीएमसी बाजारात छापा टाकून इथिलिनची फवारणी केलेले हापूस जप्त केले.

व्यापाऱ्यांनी नैर्सगिक अथवा गॅस चेंबर मध्ये हापूस आंबा पिकवण्यावर लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन अन्न व औषध विभागाने केले आहे. यासंदर्भात सहाय्यक आयुक्त सुरेश देशमुख यांच्याशी संपर्क झाला नाही.

इथेफॉनचे परिणाम..

केळी पिकविण्यासाठीही इथेफॉन या रसायनाचा भारतात वापर केला जात असे. या रसायनाच्या अंशामुळे फळ तातडीने पिकते, मात्र त्याची नैसर्गिक चव नष्ट होते. इथेफॉन मानवी शरीरामध्ये गेल्यास विविध प्रकारच्या आजारांना निमंत्रण मिळू शकते.

कॅल्शियम कार्बाइडने हापूस आंबे आता पिकवणे जवळजवळ बंद झाले आहे. सरकारने त्याला पर्याय इथिलिन फवारणीचा दिला होता. त्यातही आता घातक रसायन आढळून आले असून अचानक ही पध्दत बंद करण्याचे आदेश आहेत. त्यासाठी अन्न व औषध विभागाने व्यापाऱ्यांशी संवाद साधण्याची गरज आहे. कोणतीही मुदत न देता झालेल्या कारवाईने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.

– बाळासाहेब बेंडे, माजी संचालक, एपीएमसी फळ बाजार, तुर्भे

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-04-2018 at 03:05 IST