सावंतवाडी  : बाजारात सध्या आंब्याचा हंगाम जोरात सुरू आहे. खेडोपाडय़ातील महिला आंबा विक्रीसाठी थेट बाजारात आणत आहेत. अशातच हजाराबाहेर पोहोचलेला हापूस आज डझनाला दोनशे ते अडीचशेपर्यंत आला आहे. वातावरणात वाढलेला उष्मा व आवक वाढल्यानेच हा दर स्थानिक बाजारपेठेत उतरंडीकडे गेला आहे. तसेच अवकाळी पाऊसाची भीती देखील बागायतदार शेतकऱ्यांना सतावत आहे. सिंधुदुर्गात मोठय़ा प्रमाणात हापूस आंब्याचे पीक घेतले जाते. दरवर्षी अवकाळी पाऊस तसेच इतर नैसर्गिक संकटांचा सामना करत आंबा बागायतदार स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर्षीही आंबा बागायतदारांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला. यातूनच कसेबसे वाढविलेल्या फळाला सुरुवातीला मोठा दर मिळाला; मात्र आतापर्यंत हजाराच्या बाहेर आंब्याला दर होता. वातावरणात झालेला बदल आणि उष्णतेचे वाढलेले प्रमाण पाहता झाडावरील फळ लवकर तयार झाल्याने मोठय़ा प्रमाणात काढणी झाली. परिणामी बाजारपेठेत हापूस आंब्याची आवक वाढली आणि हळूहळू हा दर खाली आला. डझनाला पाचशे ते आठशेपर्यंत आठवडय़ापूर्वी असलेला दर आज दोनशे-अडीचशेपर्यत येऊन ठेपला आहे. दुसऱ्या बाजूने विचार करता हापूसबरोबर आज गोवा मानकूरही बाजारात दाखल झाला आहे. हापूसला बरोबरी करताना त्याला चांगला दर मिळत आहे. चांगले मोठे फळ असेल, तर तीनशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ग्राहकांकडूनही त्याला मोठी मागणी आहे. तोतापुरी, पायरी आंबेही बाजारात दाखल झाले आहेत. त्यामुळे हापूसचा दर खाली घसरला आहे. सावंतवाडी मार्केटमध्ये येणारा आंबा ग्रामीण भागातून येतो. पहाटे बागायतदार थेट मार्केटमध्ये येऊन विक्रेत्यांना आंबा पुरवतात. त्यावर शंभर-दोनशे रुपये चढवून येथील विक्रेते तो विकतात. काही बागायतदार थेट विक्री करताना दिसून येतात. त्यामुळे हा दर प्रत्येकाकडे वेगळा दिसून येतो. तरीही हापूसचा दर दोनशे ते चांगल्या फळास चारशेपर्यंत आहे. काही दिवसांत हा दर आणखी उतरण्याची शक्यता आहे; मात्र बाजारात कॅिनग घेणे सुरू झाल्याने बागायदार झाडावरील आंबा न पिकवता तो थेट कॅिनगला घालतात. त्यामुळे मेहनत व वेळ वाचतो. शिवाय दरही चांगला मिळत असल्याने हा पर्याय निवडल्याचे चित्र सर्वत्र आहे. दुसरीकडे पिकविलेला आंबा कॅिनगला घातल्यास त्यालाही दर चांगला आहे. एक डझन मोठय़ा फळाचे वजन तीन किलोपर्यंत जाते. आज ६० रुपये प्रति किलो दराने पिकविलेले आंबे घेतले जातात. त्यामुळे बाजारात सध्या आंब्याची आवक कमी झाल्यास पुन्हा हापूसला दर मिळणार असल्याचे विक्रेते सांगतात. सध्यातरी सर्वसामान्यांना परवडण्याइतपत हापूसचा दर आल्याने आंबा खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘थेट बागायतदारांकडून आम्ही आंबा खरेदी करतो. एकदम जास्त प्रमाणात आंबा उचल केल्याने आम्हाला दरात काहीशी सूट मिळते. तोच आंबा दिवसभर बाजारात बसून आम्ही विक्री करतो. डझनामागे पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त रुपये आम्हाला मिळतात; मात्र तो न खपल्यास नुकसानही सोसावे लागते. आता मोठय़ा प्रमाणात आंबा दाखल झाल्याने दर उतरला आहे.’

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mango prices fall in sindhudurg district zws
First published on: 16-05-2022 at 01:13 IST