Manikrao Kokate Political Journey Controversies in Maharashtra Politics : फटकळ आणि रोखठोक वक्तव्य, राजकारणात अनुभवी असूनही बेपर्वा वृत्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे सतत चर्चेत असतात. बनावट कागदपत्रांच्या आधारे नाशिक येथे शासकीय कोट्यातील सदनिकाचा लाभ घेतल्याच्या प्रकरणात नाशिक येथील कनिष्ठ आणि वरिष्ठ न्यायालयाने त्यांना दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात कोकाटे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली.

उच्च न्यायालयाने नाशिक न्यायालयाचा निर्णय निलंबित केला. आणि त्यांना जामीन मंजूर केला. परंतु, दोषसिध्दतेला स्थगिती न दिल्याने आधीच मंत्रीपद गमावणाऱ्या कोकाटे यांची आमदारकीही गेल्यात जमा आहे स्वत:वकील असलेल्या माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळात घेतल्यापासून वेगवेगळ्या कारणास्तव त्यांच्या बचावासाठी पक्षाचे नेते अजित पवार यांनाच प्रयत्न करावे लागले. परंतु, ३० वर्षांपूर्वीचे प्रकरण पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे यांच्या मानगुटीवर येवून बसले. आणि अजित पवार यांच्या हातात त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही.

जळगावचे माजी मंत्री सुरेशदादा जैन हे राजकारणात सक्रिय असताना सतत वेगवेगळे पक्ष बदलून निवडणूक लढवित. आणि मोठ्या मताधिक्क्याने विजयीही होत. जळगावच्या विकासासाठी कितीही वेळा पक्ष बदलण्याची आपली तयारी असल्याचे ते सांगत. सिन्नर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व पाचव्यांदा करणारे कोकाटे यांचेही असेच आहे. सतत पक्ष बदलूनही विजयी होणारे माणिकराव यांच्या भावी राजकीय कारकिर्दीपुढे मात्र आता काळाकुट्ट अंधार आहे.

सिन्नर तालुक्यातील सोमठाणे हे कोकाटे यांचे गाव. घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कोकाटे यांची पाऊले राजकारणाच्या दिशेने महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच पडू लागली राजकारणात संपूर्णपणे सक्रिय होण्याआधीच त्यांनी कायद्याची पदवी घेतली होती. पुढे राज्यातील सर्व प्रमुख पक्षांची वारी करणारे कोकाटे यांचा पहिला पक्ष मात्र काँग्रेस. विद्यार्थी संघटना असलेल्या नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडियाच्या (एनएसयुआय) माध्यमातून त्यांनी राजकारणाचे बाळकडू घेतले. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून खऱ्या अर्थाने त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. पंचायत समिती, जिल्हा परिषदेतील एकेक पदे मिळवित त्याचा राजकीय प्रवास लवकरच आमदारकीपर्यंत जाऊन पोहचला.

किती पक्ष बदलले ?

कोकाटे यांच्या राजकीय कारकीर्दीची नौका वेगवेगळ्या पक्षांच्या किनाऱ्याला लागली. एखाद्या किनाऱ्यावर थोडी विश्रांती घेतल्यावर त्यांची नौका पुन्हा पुढील किनाऱ्याला लागत असे. त्यांनी सर्व पक्षांना जवळ करुन पाहिले. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या चारही प्रमुख पक्षांकडून त्यांनी निवडणूक लढवली. सर्व पक्षांनी त्यांना साथ दिली. अपवाद केवळ भाजपचा. कोकाटे यांनी भाजपकडून निवडणूक लढविली. परंतु, त्यांना पराभव पत्करावा लागला.

शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. तेव्हा कोकाटे यांनीही काँग्रेस सोडून शरद पवार यांना साथ दिली. १९९९ च्या निवडणुकीत निवडणुकीत शरद पवार आपणास सिन्नरमधून उमेदवारी देतील, अशी त्यांना आशा होती. परंतु, तुकाराम दिघोळे यांचा अनुभव लक्षात घेऊन शरद पवार यांनी दिघोळे यांना उमेदवारी दिली. तडक स्वभाव आणि बेधडक कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकाटे यांनी मग रात्रीतून शिवसेनेत प्रवेश करुन उमेदवारीही मिळवली आणि आमदारकीही. २००४ च्या निवडणुकीत ते पुन्हा शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले. पुढे नारायण राणे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षातून काढल्यानंतर राणे यांनी काँग्रेसला जवळ केले. राणे यांच्यावर शेकडो आमदारक्या ओवाळून टाकेन, असे म्हणणारे कोकाटेही त्यांच्याकडे गेले.

२००९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढवली आणि जिंकलीही. पुढील निवडणुकीपर्यंत मात्र ते काँग्रेसमध्ये थांबले नाहीत. २०१४ च्या निवडणुकीला भाजपचे उमेदवार म्हणून ते सामोरे गेले. परंतु, यावेळी त्यांचा अंदाज चुकला. पक्ष बदलून विजयी होण्याची त्यांची मोहीम खंडित झाली. त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे २०१९ मधील निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी करुन ते विजयी झाले. राष्ट्रवादीचे विभाजन झाल्यावर २०२४ मध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवित ते विजयी झाले. आणि पुढे मंत्रीही. लोकसभेच्या मागील निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणूनही त्यांनी नशीब अजमावून पाहिले. परंतु, शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

सततच्या विजयाची कारणे कोणती ?

नाशिकच्या आणि प्रामुख्याने सिन्नरच्या राजकारणात एक आक्रमक मराठा राजकारणी म्हणून कोकाटे यांनी आपली प्रतिमा तयार केली. या प्रतिमेमुळे एकदा यश मिळाल्यावर पुढे त्यांनी ती जाणीवपूर्वक जपली. नाशिक लोकसभा मतदारसंघातील २००९ मधील निवडणुकीत राष्ट्रवादीकडून समीर भुजबळ यांनी विजय मिळविला होता. त्या निवडणुकीतही सिन्नर तालुक्यात कोकाटे यांनी त्यांना कितपत साथ दिली, याविषयी संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर २०१४ मध्ये छगन भुजबळ आणि २०१९ मध्ये समीर भुजबळ यांच्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील पराभवात कोकाटे यांचा मोठा वाटा राहिला. दोन्हीवेळा कोकाटे यांनी उघडपणे भुजबळ काका-पुतण्यांविरोधात हेमंत गोडसे या मराठा उमेदवारास साथ दिली होती. त्यामुळे दोन्ही निवडणुकीत सिन्नर मतदारसंघातून गोडसे यांना मोठे मताधिक्क्य मिळाले होते.

सिन्नर तालुक्यात मराठा आणि वंजारी हे दोन प्रमुख समाज आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दोन मातब्बर मराठा उमेदवार विरुध्द एक वंजारी उमेदवार अशी लढत असल्यास मत विभाजनाचा फायदा होऊन वंजारी समाजाच्या उमेदवाराचा विजय सूकर होतो. दोन वंजारी समाजाचे उमेदवार आणि एक मराठा उमेदवार राहिल्यास मत विभाजनाचे गणित मराठा उमेदवारासाठी फायदेशीर ठरते. सिन्नर विधानसभा मतदारसंघातून वेगवेगळे पक्ष बदलून पाचवेळा विजयी होणाऱ्या कोकाटे यांच्या यशात या जातीय समीकरणाचा मोठा आधार आहे.

मतदारसंघातील प्रमुख कामे

कोकाटे यांनी सिन्नर मतदारसंघात अनेक कामेही केली. दुष्काळग्रस्त सिन्नरमध्ये पूरचारी कामामुळे त्यांना शेतकऱ्यांनी जवळ केले. सेझ पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. सिन्नर एमआयडीसी क्षेत्र मर्यादित असल्याने वाढीव जमीन संपादन करुन घेण्यात त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली. आदिवासी सेनानी राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला. सिन्नर तालुका क्रीडा संकुलाचे काम त्वरीत पूर्ण होण्यासाठी लक्ष दिले. सिन्नरसाठी शंभर कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून कार्यान्वित केल्याने त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली. स्थानिक पातळीवर कोणत्या समस्या सोडविणे गरजेचे आहे, याची जाण असल्याने त्या सोडविण्यासाठी त्यांनी जोरकस प्रयत्न केले. सिन्नर बस स्थानकाला आधुनिक रुप देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

अडचणीत आणणारे प्रकरण नेमके काय ?

कोकाटे यांच्या पाठीमागे सुमारे ३० वर्षांपूर्वीचे प्रकरण लागले. नाशिक शहरातील कॅनडा काॅर्नर या उच्चभ्रू परिसरात १९९५ मध्ये माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका घेतल्या होत्या. तत्कालीन त्यांचे राजकीय विरोधक दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. प्रथम वर्ग न्यायालयाने या प्रकरणात कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्ष कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे कोकाटे यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले. त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

कोणकोणते वाद पाठीशी ?

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भल्या पहाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची घेतलेली शपथ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेतील प्रकरण. त्यावेळी अजित पवार यांच्याबाजूने जे काही आमदार उपस्थित होते, त्यात कोकाटे यांचा समावेश होता. अजितदादा गटनेते असल्याने त्यांच्या सांगण्यावरुन आपण राजभवनावर गेलो होतो, अशी सारवासारव त्यांनी केली होती. पुढे महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर अजित पवार यांच्यामुळे त्यांना कृषी खाते मिळाले. त्यानंतर शेतकरी आणि कृषी खात्याविषयी त्यांनी केलेली बेधडक विधाने वादग्रस्त ठरली. कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, असे वक्तव्य करुन त्यांनी या खात्यालाच दुय्यम लेखले होते. एका दौऱ्यात त्यांनी, भिकारीसुध्दा एक रुपया स्वीकारत नाही. पण सरकार एक रुपयात पीक विमा देते, असे शेतकऱ्यांना उद्देशमून म्हटले होते.

नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी या गावात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करताना शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचा मुद्दा पुढे आल्यावर कोकाटे यांनी, कर्जमाफीचे जे पैसे मिळतात, त्याचे काय करतात ?, एक रुपयातरी शेतीत गुंतवतात काय ? त्या पैशातून साखरपुडे करता, पोराबाळांची लग्ने लावता, असे शेतकऱ्यांना बोचणारे वक्तव्य केले होते. सिन्नर तालुक्यातील नुकसानीच्या पाहणीप्रसंगी पंचनाम्यांविषयी विचारणा करण्यात आली असता, काढलेल्या पिकांचे पंचनामे करुन काय करणार, ढेकळांचे पंचनामे करायचे काय, असे प्रश्न त्यांनी केले होते. पुढे विधानसभेतील रमीचे प्रकरण गाजले. त्यावरुन वादंग उठल्यावर पक्षाने त्यांच्याकडून कृषी खाते काढून क्रीडा खाते दिले. हे खाते मिळाल्यावर ते काहीसे शांत झाले होते.

आर्थिक स्थिती कशी ?

आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या सदनिकेचा ३० वर्षांपूर्वी लाभ घेणाऱ्या कोकाटे यांची सध्याची संपत्ती विपूल म्हणता येईल अशी आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीप्रसंगी कोकाटे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सहा कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर झालेल्या २०१९ च्या निवडणुकीप्रसंगी सादर प्रतिज्ञापत्रात संपत्ती २१ कोटींची आणि मागील २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा उल्लेख ४८ कोटी इतका करण्यात आला आहे. २०१४ आणि २०२४ या वर्षातील संपत्तीची तुलना करता १० वर्षात ४२ कोटींनी वाढ झाल्याचे दिसते.