महिला अत्याचार प्रकरणात लक्ष्मण माने यांना सहकार्य केल्याचा आरोप असलेल्या मनीषा गुरव हिला सातारा पोलिसांनी रायगड येथे अटक केली. सातारा येथे न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
जकातवाडीतील शारदाबाई पवार आश्रमशाळेतील सहा महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप लक्ष्मण माने यांच्यावर आहे. तर माने यांना या कामी सहकार्य केल्याचा आरोप मनीषा गुरव हिच्यावर आहे. २२ मार्च पासून ती पोलिसांना गुंगारा देत होती. ९ एप्रिल रोजी लक्ष्मण माने पोलिसांना शरण आल्यानंतरही मनीषा गुरव फरारीच होती. तिच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सीताराम मोरे व तपासी अधिकारी श्रीरंग लंघे यांनी एक पथक तयार करून कामगिरीवर पाठविले होते. मनीषा गुरव रायगड येथे तिच्या नातेवाईकांकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळणार होती. त्याप्रमाणे महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पथकाने गुरुवारी दुपारी रायगड येथे ताब्यात घेतले होते.