‘मुख्यमंत्रीपद’ राणेंचे ‘स्वप्न’च राहील – मनोहर पर्रिकर

महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत हुजरेगिरी करून मान मिळविला असल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत,

महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत हुजरेगिरी करून मान मिळविला असल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत, असे गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगून सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या पर्यटन विकासात नारायण राणे यांचा अडसर असून ते गुंतवणूकदाराकडे पार्टनरशिप मागत असून मुख्यमंत्रीपदाचे त्यांचे स्वप्नच राहील, अशी टीका त्यांनी केली.
भाजप उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर बोचरी टीका करताना दिल्लीची हुजरेगिरी करणाऱ्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका चालविली असल्याने राज्यात भाजपला १६० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा पर्रिकर यांनी केला.
भाजप स्वबळावर निवडणूक लढवीत असल्याने कोकणच्या १५ विधानसभा मतदारसंघात गोवा राज्यातील सुमारे ७०० भाजप पदाधिकारी निवडणूक प्रचारात उतरले आहेत. त्यामुळे १५ विधानसभा मतदारसंघात ९ जागांवर विजय निश्चित झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्यामुळे महाराष्ट्रातील भाजपची एकहाती सत्ता येईल, असा विश्वास मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केला.
भाजपवर अफझलखानची टीका करताना शिवसेना गेल्या २५ वर्षांची जवळीक विसरली आहे. अफझलखान कोण, शिवसेनेने जाहीर कराव.े तेच अफझलखान आहेत. युती तोडणारा शिवसेनेचा सूर्याजी पिसाळ कोण? त्याची चौकशी करून प्रथम कारवाई करावी, असे आवाहन पर्रिकर यांनी केले.
गोवा राज्यापेक्षा पर्यटनदृष्टय़ा विकसित होणाऱ्या सिंधुदुर्गात समुद्राकडील जमिनीच खरेदी केल्या गेल्या. या भागात गुंतवणूकदार आणण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. उलट गुंतवणूकदार आल्यास नारायण राणे पार्टनरशिप मागतात. तसेच दादागिरी व गुंडगिरी असणाऱ्या या जिल्ह्य़ात गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार घाबरतात अशी टीका मनोहर पर्रिकर यांनी करून मुख्यमंत्री होण्याचे राणेंचे स्वप्नच राहील, असे ते म्हणाले.
उमेदवार राजन तेली, अतुल काळसेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही आपले विचार मांडले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Manohar parrikar criticize narayan rane