मराठा आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांचा उपोषणाचा १३ वा दिवस आहे. उपोषणादरम्यान ते सातत्याने सरकारवर टीका करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत आहेत. दरम्यान, मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी मनोज जरांगे माझे भाऊ आहेत, मी त्यांना जेवणाचं निमंत्रण देते असं त्या म्हणाल्या. त्यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. भाऊ लढाईच्या मैदानात असताना कसा जाणार? मात्र भाऊबीजेला बहिणीकडे नक्की जाणार असं जरांगेंनी म्हटलं आहे.
मनोज जरांगेंचं अमृता फडणवीसांना उत्तर
अमृताताईंनी सांगितलं आहे ना जेवायलाही जाऊ, पण भाऊबीजेला. आता आंदोलन आहे ना आता बोलवूनये. भाऊ मैदानात असताना बहिणीने जेवायला बोलवू नये. भाऊ संकटात येत असतो, बहिणीने तेवढा तरी बारकाईने विचार करावा. आमच्या बहिणीने आम्हाला भाऊबीजेला बोलवावं आम्ही साडी चोळी घेऊन जाऊ हा मनोज जरांगेचा शब्द आहे. लढाईच्या मैदानातून जेवायला बोलवत असाल तर हार पत्करावी लागेल. ताईंनी तो विचार, तो दृष्टीकोण आणि मायेची भावना आमच्या बाजूने ठेवावी. एखादा माणूस चांगल्या भावनेने विषय मांडत असेल तर त्यावरुन चिडण्याची आवश्यकता नाही. ताईंनी ज्या भावनेने, ज्या मायेने बोलवलं आहे ते मान्य पण आत्ता ती वेळ नाही. संकटात असल्यानंतर जेवायला नाही बोलवलं जात. भावाचं नातं आहे म्हटल्यावर भाऊबीजेला जेवायला जाणार. आज मात्र माझ्या मराठा लेकरांसाठी मी लढतोय, ताईंकडे नंतर जाणार असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
अमृता फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
नागपूरमधील एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना या उपोषणाविषयी विचारण्यात आलं. त्यावर त्या म्हणाल्या, “मनोज जरांगे माझे भाऊ आहेत. मी त्यांना घरी जेवणाचं निमंत्रण देते.” असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं होतं.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
मराठा समाजाला आरक्षण देताना संविधानाच्या चौकटीत आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन असलेले सर्व पर्याय तपासले जातील. कोणाच्या ताटातले काढून कोणाच्या ताटात टाकणारे आम्ही नाही. सर्व समाजांना न्याय देण्याची सरकारची भूमिका असून संविधानात ज्या बाबींची तरतूद आहे त्या निश्चितपणे दिल्या जातील. मराठा समाजासाठी आतापर्यंत जे निर्णय घेतले, सवलती दिल्या त्या आम्हीच दिल्या असून मराठा समाजाला न्याय हेच सरकार देणार, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
