मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह आहेत. यातच मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

जात वैधता प्रमाणपत्र रद्द केले जात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. याच मुद्यांवर बोलताना आज (८ ऑगस्ट) मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ‘मला अटक करण्याचा सरकारचा नवा डाव आहे’, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. तसेच मला फक्त अटक करून दाखवाच, असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला आहे.

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

“मी काय चुकीचं बोलतोय? कुणबी प्रमाणपत्र रद्द करायला लावले जात आहेत, मग मी काय चुकीचं बोलतो? एका बोडखे नावाच्या व्यक्तीची जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी झाली आणि त्याच्याच बहिणीची जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी रद्द करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून आमच्या मुळावर का उठले आहेत? आमच्या जात वैधता प्रमाणपत्र रद्द करा, अशा आशयाचं बावनकुळे यांचं हे पत्र आहे. मग मी काय चुकीचं बोलतोय? आमचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द का केले जात आहेत? सरकारने माझी काय चूक हे देखील सांगावं. गेल्या एक वर्षांपासून आम्ही काहीही बोलत नव्हतो”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

“मराठ्यात फूट पाडून गैरसमज पसरवता येईल हा देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करत आहेत का? अशी देखील चर्चा आहे. सरकारने चूक सुधारावी आणि आमचे जात वैधता प्रमाणपत्र पुन्हा द्यावेत, आपण काहीही बोलणार नाहीत. पण जर जात वैधता प्रमाणपत्र दिले नाहीत, तर मराठा समाज गप्प बसणार नाही. चूक केल्यावर आम्ही माफ करणार नाही”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

“सरकारच्या हे लक्षात येत नाही की, मराठा समाज आता शांत बसणार नाही. सरकारने हा जो नवीन डाव रचला आहे ना, आताची परिस्थिती तुम्हाला सांगू का? मला हे पहाटे साडेपाचच्या सुमारास समजलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळे डाव करून पाहिले, आता शेवटचा डाव होता की आमच्या रॅलींवर हल्ला करायला लावायचा किंवा मला अटक करायची. म्हणजे रॅलींवर दगडफेक झाली पाहिजे असा डाव होता. आमचा रोड बंदोबस्त काढायचा, धाराशिवच्या बॉर्डरपर्यंत आमच्याबरोबर बंदोबस्त होता, पण त्यानंतर बंदोबस्त नव्हता. मला हे रात्रीच समजलं होतं आणि सकाळी तेच झालं. मी खोट कधीच बोलत नाही. आता मला अटक करायला कोण येणार आहे, फक्त याच. मग तुम्हाला मराठे काय असतेत ते समजेल”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.