छत्रपती संभाजीनगर : माझा गैरसमज कोण करते ती नावे सांगा, यापूर्वी आमदार प्रसाद लाड आणि उदय सामंत यांना माझ्या आजूबाजूचे चांगले होते. संभाजीनगरमध्ये येऊन फक्त षडयंत्र करत आहात आणि राजकीय स्टंट करायची भूमिका आहे, असे म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर टीका केली. पण टीकेच्या केंद्रस्थानी पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होते. ‘एकनाथ शिंदे यांनी लवकर शहाणे व्हावे अन्यथा एका फटक्यात संपशील’ असेही जरांगे एकेरी भाषेत म्हणाले.
संभाजीनगरला बसून दंगल घडवायचे ठरवले आहे. सामंतआणि शिरसाट यांचं फोनवर बोलणे झाले असेही जरांगे म्हणाले. मराठ्या – मराठ्यांमध्ये दंगल घडवायचे पाप एकनाथ शिंदे करणार आहे, आणि त्याला जबाबदार तेच राहतील, असेही जरांगे म्हणाले. आमदारांकडे गुंड असतील तर आम्ही ते गुंड आम्ही दगडाखाली ठेचू, असेही जरांगे म्हणाले. शिंदेंविषयी तुम्हाला प्रेम वाटते मग आम्हाला समाजाची माया येत नसेल का, त्यांना फक्त भाषेचे निमित्त करायचे आहे. असा आराेपही जरांगे यांनी केला. प्रताप सरनाईक यांनाही सरपटनाईक असा उल्लेख करुन त्यांच्यावर टीका केली. आमदारांकडे गुंड असतील आमची तरुणही त्यांना बघतील, असेही जरांगे म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतल्यानंतर पत्रकार बैठकीत मांडलेल्या मुद्द्यांचा जरांगे यांनी समाचार घेतला. या पुढे भाषा अधिक तीव्र होईल असेही ते म्हणाले.
जरांगे यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा बुधवारी अकरावा दिवस होता. त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ बुधवारी जिल्हयातील अंबड-घनसावंगी मार्गावर ताडहदगाव फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे जालना-परभणी रस्त्यावरील केंधळी येथेही रस्ता रोको आंदोलन करण्यात आहे.
बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार येथे कांही जणांनी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून मराठा समाजाच्या मागण्या करण्यात याव्यात यासाठी घोषणाबाजी केली. मंगळवारी सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या दरम्यान सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर महाकाळा फाटा येथे महिलांनी रस्ता रोको आंदोलन केले.
