राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच सध्या मराठा आरक्षण अंमलबजावणीच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी मागील १४ दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलं होतं. मात्र, त्यांच्या मागण्यांबाबत अद्यापही राज्य सरकारने कोणताही ठोस तोडगा काढलेला नाही. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण अंमलबजावणीच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

आज १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता अंतरवाली सराटीत मराठा समाजाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करत मुंबईत आंदोलन करण्याची अधिकृत घोषणा अंतरवाली सराटीत बोलताना केली आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी महिलांना एक महत्वाचं आवाहन केलं आहे.

“लताताई (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी) आणि अमृताताई (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी) यांच्या घरी जाऊन महिलांनी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करावा”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. दरम्यान, लाडक्या बहिणींनी लताताई आणि अमृताताईंना हळद-कुंकू देऊन आरक्षण मागावं, असंही आवाहन मनोज जरांगे यांनी महिलांना आवाहन केलं आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?

“आम्ही जात आहोत मुंबईतील आझाद मैदानावर आणि आमची माय-माऊली, लाडक्या बहिणी जातील अमृता फडणवीस, लता शिंदे यांच्या घरी. तेथे जाऊन मराठा महिलांनी लताताई आणि अमृताताईंना हळद-कुंकू देऊन आरक्षण मागावं. आता त्यांची अडचण अशी होईल की एक जणाची लाडकी बहीण आणि एक जणाची लाडकी दीदी. त्यामुळे तुमच्यासाठी त्यांना त्या ठिकाणी मंडप टाकणं भाग आहे. त्यामुळे महिलांनी लता शिंदे यांच्या घरी आणि अमृता फडणवीस यांच्या घरी जाऊन हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करा. मात्र, कोणत्या हळदी-कुंकवाचा? तर मराठा आरक्षणाच्या हळदी-कुंकवाचा. तेथे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करत असताना सर्व महिलांनी लता शिंदे आणि अमृता फडणवीस यांना सांगायचं की तेवढं आम्हाला मराठा आरक्षण द्यायला सांगा”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.

मनोज जरांगेंची आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर आज, १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता समर्थकांची एक महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करत मुंबईत धडक देण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

आंदोलनाचा मार्ग कसा असणार?

जालना येथील अंतरवाली सराटीमधून सुरू होणाऱ्या या मोर्चाचा पहिला मुक्काम पाटोदा या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर श्रीगोंदा येथे दुसरा मुक्काम असणार आहे. त्यानंतर हडपसर (पुणे) या ठिकाणी तिसरा मुक्काम असणार आहे. त्यानंतर खोपोली येथे मुक्काम करत पाचव्या दिवशी मुंबईच्या आझाद मैदानात शांततापूर्ण मार्गाने हा मोर्चा धडकणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे.

मनोज जरांगेंच्या मुंबई मोर्चाचा मार्ग कसा असेल?

अंतरवली सराटीतून सुरू होणारा हा मोर्चा शांततापूर्ण मार्गाने मुंबईच्या दिशेने जाईल. चार ठिकाणी मुक्काम करत पाचव्या दिवशी हा मोर्चा मुंबईत दाखल होईल.

१५ सप्टेंबर : अंतरवली सराटीतून मोर्चाला सुरुवात; पहिला मुक्काम पाटोदा (जि.बीड).

१६ सप्टेंबर : दुसरा मुक्काम श्रीगोंदा (जि.अहिल्यानगर).

१७ सप्टेंबर : तिसरा मुक्काम हडपसर (पुणे).

१८ सप्टेंबर : चौथा मुक्काम खोपोली (रायगड).

१९ सप्टेंबर : रोजी मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानात दाखल होईल.