मनोज जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी नेते आणि आंदोलकांनी ते जातीयवादी असल्याचा आरोप केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मी कधीच जातीयवाद केला नाही. मी केवळ माझ्या गोरगरीब बांधवांची मागणी लावून धरली आहे. उलट ओबीसी नेतेच जातीयवाद करत आहेत. मी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे ही माझी मागणी आहे आणि मी ती इथून पुढेही माझी मागणी लावून धरणार आहे. मात्र, आता ओबीसी नेत्यांचे चेहरे उघडे पडले आहेत, सगळ्यांचे बुरखे आता फाटले आहेत, खोटे मुखवटे गळून पडले आहेत.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. पाटील म्हणाले, आपण मंडल आयोगाला न्यायालयात आव्हान देऊ शकतो. मंडल आयोगाला आव्हान देऊन तो रद्द ही करू शकतो. मुळात गोरगरीब ओबीसी बांधवांचं वाट्टोळ करण्याची माझी इच्छा नाही. कारण त्यांनी काही चूक केलेलीच नाही. १०-१२ ओबीसी नेत्यांचं टोळकं एकत्र आलं आहे. ते टोळकं ओबीसी समाजाचं वाट्टोळं करत आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही गोरगरिबांच्या अन्नात माती कालवत नाही. मी आतापर्यंत संयम ठेवला आहे आणि इथून पुढेही संयम ठेवेन. तसेच मराठा समाजातील बांधवांना आव्हान करेन की तुम्ही देखील संयम बाळगावा. मात्र आमच्या लेकरांच्या मानेवर कोणी कुऱ्हाड मारत असेल तर आमचा नाईलाज आहे. तसेच मला मराठा नेत्यांना देखील एक गोष्ट सांगायची आहे. त्यांनी आता आपल्या जातीच्या मागे उभे राहायला हवं. आपल्या समाजातील काही पोरं तुम्हाला यापूर्वी वाईट बोललीही असतील, मी ती गोष्ट नाकारत नाही. आपल्या समाजातील काही लोकांनी मराठा नेत्यांना त्रास दिलाही असेल. परंतु, त्या गोष्टी मागे सोडून तुम्ही समाजाचा बाजूने उभे रहा. शेवटी ते आपलेच लोक आहेत. ते कधी काही चुकून बोलून गेले असतील तर ती गोष्ट विसरून जा. कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून त्याने आपल्याला काही फरक पडू नये. काही ओबीसी नेते आता काडी लावण्याचा प्रयत्न करतात. मराठ्यांचा तिरस्कार करतात. मात्र तुम्ही आता सावध होणं गरजेचं आहे. ओबीसी नेते ओबीसींच्या आंदोलनात सहभागी होतात. मराठा नेत्यांनी देखील मराठ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायला हवं.

“…तर तुम्ही राजकारण विसरून जाल”, लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना टोला; म्हणाले, “या सत्ताधाऱ्यांना आमची…”

जरांगे पाटील म्हणाले, आता मराठा तरुणांनी देखील बदललं पाहिजे. माझा मराठा तरुणांना एक महत्त्वाचा संदेश आहे. त्यांनी आता आपल्या नेत्यांना बोल लावणं बंद करायला हवं. आपण काय चूक करतो माहितीये का? आपण आपल्याच नेत्यांना वाईट बोलतो. आपले नेते नालायक आहेत असं आपण म्हणतो. ओबीसी बांधव नेमकं त्याच्या उलट वागतात. त्यांना माहित आहे की ओबीसींचे नेते नालायक आहेत. तरी देखील ते आपल्या नेत्याला नालायक म्हणत नाहीत. ते आपल्या नेत्याला चांगलाच नेता म्हणतात. आपणही हा बदल करायला हवा. ते त्यांच्या नेत्याला जवळ करतात तसंच आपण देखील आपल्या नेत्याला जवळ करायला हवं. आपण नेमकं त्याच्या उलट वागतो. आपण आपल्याच नेत्याला दूर लोटतो. त्यामुळे मी मराठा तरुणांना एवढच सांगेन की त्यांनी आता मराठा नेत्यांना वाईट बोलणं बंद करावं. आपण ओबीसींकडून ही गोष्ट शिकायला हवी.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange appeal to maratha youth dont say anything wrong about our leaders lears from obc asc