मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आणि सरकारने यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच करण्याचे जाहीर केले आहे. १५ सप्टेंबर रोजी मनोज जरांगे अंतरवली सराटीतून मुंबईकडे निघणार असून १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. मात्र, मुंबई पोलिसांनी त्यांच्या या उपोषणाला परवानगी नाकारली आहे. यानंतर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.
परवानगी नाकारल्यावर काय म्हणाले जरांगे?
“गेल्या वर्षीही गणेश उत्सव होता, तेव्हा कुठे गेला होता कायदा? आम्ही सगळे नियम पाळून शांततेत राहिलो. देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांचा अपमान करायचा आहे. न्यायदेवता असो, न्यायाधीश असोत देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांचा अपमान करायचा आहे. त्यांना अराजकता माजवायची आहे. राज्य अस्थिर ठेवायचं आहे. जातींमध्ये वाद लावायचा आहे. सण-उत्सवाच्या काळात राज्य दुषित करायचं आहे. मुख्यमंत्री राज्य दुषित करत आहेत. आम्ही कुठलीही बाधा आणलेली नाही. १९ तारखेला आम्ही तिथे जाणार आहे. सगळ्या अटी शर्थी पाळून आंदोलन करणार आहोत. तरीही तुम्ही संमती देणार नसाल तर हे राज्य कसलं? मग हे संविधानाचं राज्य नाही आणि कायद्याचंही राज्य नाही. ही सरळ सरळ हुकूमशाही चालली आहे. त्यांनी षडयंत्र रचलं आहे की काहीतरी कुटाणे करुन गोळ्या घालून याला म्हणजे मला मारायचं. पण मी शरण जाणार नाही तुम्हाला, गुडघे टेकणार नाही. असले कायदे चालवणारे मुख्यमंत्री मला मान्य नाहीत.” असं जरांगेंनी म्हटलंय.
आडमुठ्या सरकारचे नियम आम्हाला मान्य नाहीत-जरांगे
आडमुठ्या सरकारचे नियम आम्हाला मान्य नाहीत. १५ सप्टेंबरला आम्ही इथून जाणार. सरकार म्हणून जर असं वागणार असाल, न्यायदेवतेचा अपमान करत आहात. आम्ही सलाइन, उपचार सगळं बंद. देवेंद्र फडणवीस यांना माझं मरण हवं आहे ना? असं मरण आलेलं चालेल. पण मी फडणवीसांसमोर झुकणार नाही. तुम्ही दलित मुस्लिमांवर अन्याय करत आहात. तुम्ही बंजारा समाजावर, धनगरांवर, मराठ्यांवर अन्याय करणार. तुम्हाला राज्य अस्थिर करायचं आहे. जे काही होईल त्याला आता फडणवीस जबाबदार असतील असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं आहे.
कितीही त्रास द्या मी झुकणार नाही, गुडघे टेकणार नाही-जरांगे
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी कितीही त्रास देऊ द्या, कितीही संकटं येऊ द्या. मी झुकणार नाही, गुडघे टेकणार नाही असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. मी माझ्या जातीलाच माय मानलं आणि बाप मानलं आहे. मी तुम्हाला दिसेन की नाही माहीत नाही. मी टोकाचं लढणार आहे. मी ज्या रस्त्यावरून चाललो आहे त्या रस्त्यावर पाऊस असला तरी या. आशीर्वाद द्या, तुमच्या आशीर्वादावर मी जगू शकतो असंही जरांगे म्हणाले. मी मेलो तरीही चालेल मी मागे हटणार नाही असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.
