Manoj Jarange Hunger Strike Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटीत पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले असून आजचा उपोषणाचा ११ वा दिवस आहे. आज त्यांनी थेट मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर तोफ डागली. तसंच, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.
“राधाकृष्ण विखे पाटील मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष झाल्यानंतर मराठा समाजाला नेता मिळाला असल्याचं वाटलं. ते समाजाचं कल्याण करतील असं वाटलेलं. पण त्यांनी आपल्याला पुरात नेलं आणि तिथे सोडून ते परत मागे आलेत”, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
राधाकृष्ण विखे पाटील सर्वांत निष्क्रिय अध्यक्ष
“सरकारला समजून घ्यायला, बाप आहे का आमचा? राधाकृष्ण विखे पाटील हे सर्वांत जास्त निष्क्रिय अध्यक्ष आहेत. त्यांनी मराठा समाजावर हल्ल्याचं नियोजन केलं. उपसमितीचं अध्यक्ष पदही हवं, बोलल्यावर रागही येतो. तुम्ही फक्त हल्ला करा, तुम्हाला उभं राहायलाही जागा राहणार नाही”, असा इशाराही त्यांनी दिला.
विखेंनी फडणवीसांचं स्वप्न पूर्ण केलं
“आम्ही एक पाऊल पुढे यायचं म्हणजे काय? मराठ्यांचं वाटोळं करून बसला आहात. आता तुम्हाला सुट्टी नाही. हे काम करताना सत्तेचा आनंद घ्यावा लागतो, तेव्हा अपमान पचवण्याची ताकद असली पाहिजे. देवेंद्र फडणवीस मराठ्यांचं काम करू देत नाहीत. फडणवीसांनी त्यांना आमच्यामध्ये घातलं. फडणवीसांचं स्वप्न विखेंनी पूर्ण केलं”, असं म्हणत ते म्हणाले, “विखेला फडणवीस काम करू देत नाही. विखेंनी समाजाला खरं बोलावं, आतापर्यंत समाजाचं खूप वाटोळं झालं. सातारा संस्थानचं गॅझेट एका महिन्यात देतो म्हणालेले आता वर्ष होईल. मग काय दिलं तू? इतका नाश केला. मराठ्यांना मोठं करायला आला की मराठा संपवायला आला? जात पडताळणीला चांगला माणूस द्या म्हटलं तर त्यांच्या हिताचं माणूस आणतोय. मराठ्यांचं वाटोळं करण्यामागे विखे आहेत”, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
मराठा क्रांती मोर्चा फोडणं, समन्वयकांना हाताशी धरणं, माझ्या कटाच्या आरोपींना भेटणे, असे विविध आरोप मनोज जरांगेंनी विखे पाटलांवर केले.
