मराठा आंदोलक मनोज जरांगे हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलं आहे. याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी सुरु केलेला लढा. तर दुसरं कारण आत्ताचंच आहे. मागच्या रविवारी त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी खालच्या पातळीवर टीका केली. त्याआधी त्यांनी आपल्या भाषणांमधून छगन भुजबळांवर टीका केली होती. आता छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंचं नाटक सगळ्या महाराष्ट्राला लक्षात आल्याचं म्हटलं आहे.

आज मनोज जरांगे काय म्हणाले?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद दौऱ्यास आजपासून सुरुवात झाली आहे. अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील वानगाव या ठिकाणी दाखल झाले. यावेळी मराठा समाज बांधवांना जरांगे यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे. “देवेंद्र फडणवीस पोलिसांचे कान फुंकत आहेत. माझ्याविरोधात एसआयटी चौकशी लावली आहे. पण मी इंचभरही मागे हटणार नाही. मी चौकशीसाठी तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मला आत टाकून दाखवावेच, त्यानंतर भावनिक लाट काय असते? हे त्यांना दिसेल. तुमचा सगळा सुपडा साफ होईल”, असे आव्हानच मनोज जरांगे यांनी फडणवीस यांना दिले.

हे पण वाचा- मनोज जरांगेंच्या छातीत दुखू लागल्याने उपचार सुरु, डॉक्टर म्हणाले…

मनोज जरांगे पुढे म्हणाले, माननीय न्यायालयाने आम्हाला शांततेत रास्ता रोको करण्याचे निर्देश दिले होते. तरीही आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. आम्ही काहीही करणार नव्हतो. माझ्या उपोषणाचा १५ वा दिवस असताना २२ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने १३ मार्चला पुढील तारीख दिली होती. पण एका रात्रीत गृहमंत्र्यांनी तारीख बदलून २३ फेब्रुवारी करून घेतली. त्यानंतर एका गुप्त बैठकीत ठराव झाला, ‘मनोज जरांगेला १० टक्के आरक्षण स्वीकारायला लावा, नाहीतर त्याला गुंतवा.’ असा ठराव झाल्याचे कळल्यामुळे त्यादिवशी आमच्याकडून आक्रमक प्रतिक्रिया दिली गेली. मात्र या सगळ्यावर मनोज जरांगेची नाटकं महाराष्ट्राला कळली आहेत असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे छगन भुजबळ यांनी?

काय त्या मनोज जरांगेचं घेऊन बसलात? एका क्षणी हॉस्पिटलमध्ये असतो मग तो तिकडे आंतरवली सराटीला जातो. नंतर परत म्हणतो की माझ्या छातीत दुखू लागलं. परत चालला हॉस्पिटलला. त्याचं नाटक सगळ्या महाराष्ट्राला आणि संपूर्ण मराठा समाजाला लक्षात आलं आहे. आपण सगळं केलं मराठा समाजाला आरक्षण दिलं. नवी नोकरभरती आहे त्यात मराठा आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या देण्याचे जीआर निघाले आहेत. सगळं करुनही मनोज जरांगे ऐकत नसतील तर काय बोलणार? हे मारुतीचं शेपूट आहे ते वाढणार आहे. प्रसिद्धीची नशा चढते आणि ती कधीच प्रसिद्धी न पाहिलेल्या लोकांना ती अधिक चढते. अस म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर टीका केली आहे.