Manoj Jarange Patil news response to Lalita Tarakh allegations : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं असून सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांच्याविरोधात आता त्यांच्याच समाजातील आणि कधीकाळी त्यांना साध देणाऱ्या माणसांनी टीका करायला सुरुवात केली आहे. चौथं उपोषण ज्या ललिता तारख यांनी सोडलं, त्यांनीच जरांगेंवर आरोप केले. जरांगेंनी ग्रामस्थांना फसवलं असल्याचा आरोप करत त्यांच्या उपोषणाची मी साक्षीदार आहे, त्यांनी कसं उपोषण केलंय, हे मी वेळ आल्यावर बाहेर काढेन असंही त्या म्हणाल्या. त्यांच्या या दाव्यावर आता जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ललिता तारख काय म्हणाल्या होत्या?
जरांगेंनी गावकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन महिलांचा वापर केल्याचा आरोप तारख यांनी केला. “आम्हाला भावनिक केले. आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही. यापुढे अशी नाटकं बंद करा. उपोषण करूच नका”, अशी टीका तारख यांनी केला. “तुम्ही कसे उपोषण केले, काय केले, दोन दिवस उपाशी राहिल्यावर माणसाची काय अवस्था होते. तुमच्या उपोषणाची मी साक्षीदार आहे. ज्यावेळी खरी वेळ येईल, त्यावेळी मी सर्व सांगेन”, असा इशाराही तारख यांनी दिला. “तुम्ही आमच्या गावाचा वापर करून घेतला, तसाच १२३ गावांचाही वापर करून घेतला. पंढरपूरमध्ये एक तरी कुणबी नोंद दाखवा; त्यानंतरच आमच्या गावात येऊन दाखवा”, असे आव्हान तारख यांनी दिले.
मनोज जरागेंनी काय प्रत्युत्तर दिलं?
दरम्यान, मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना तारख यांच्या दाव्याविषयी विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, आंतरवलीच्या गावावर मी काहीच बोलणार. कितीही त्रास दिला तरीही बोलणार नाही. कारण, खरंच या गावाने रक्त सांडलं आहे. समाजासाठी झटले आहेत. कोणती भगिनी बोलली असेल तरी मी त्यावर काहीच बोलणार नाही. कारण, समाजासाठी काही केलेलं विसरायचं नसतं. माझं म्हणणं आहे की गावंही समाजासाठी लढलं आहे, समाजही गावासाठी लढला आहे. आपण एकमेकांसाठी लढून आपल्या समाजाचा फायदा करून दिला आहे. “
तसंच, माझ्याविरोधात षडयंत्र रचलं जात असून मला एकटं पाडण्याचा डाव सुरू आहे, असाही दावा त्यांनी केला. आरक्षणासाठी तीन महिन्याचा वेळ दिला आहे. या वेळेत मला किती बदनाम करता येईल, माझ्याविरोधात अफवा पसरवता येईल, यात वेळ घालवला जात आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
