Manoj Jarange Patil Mumbai Protest : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, मनोज जरांगेंच्या १९ सप्टेंबरच्या आंदोलनालाही मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यावरून मनोज जरांगे पाटलांनी संताप व्यक्त केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली
जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम २०२५ चा नियम भंग करणार असल्याची खात्री आहे, असं म्हणत मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटलांना आंदोलनासाठी परवानगी नाकारली. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखू शकत नाही असा निर्णय उच्च न्यायालयानं दिला होता. त्यामुळे सरकार न्यायदेवतेचा अपमान करत आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
“आंदोलन करण्याआधीच आम्ही नियमभंग करणार आहोत, असं त्यांना का वाटत आहे? कोणत्या कायद्याने राज्य चालवत आहात? कशाला असते राज्यकर्ता. ही काय अस्थिरता आहे. स्थिर सरकार ठेवायचं आहे की नाही?” असे विविध संतप्त प्रश्न आज मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केले.
गणेश उत्सवाच्या मिरवणुका निघणार नाहीत का?
ते पुढे म्हणाले, “म्हणे मिरवणुका काढता येणार नाहीत. गणेश उत्सवाच्या मिरवणुका निघणार नाहीत का? कोणतं हिंदुत्त्व? मी १९ ला मुंबईला जाणारच. पोलिसांच्या परवानगीबाबत वकील बांधव ठरवतील.”
“१९ सप्टेंबरला आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करायचं ठरवलं आहे, ते होणारच. न्यायदेवतेचे नियम आम्ही पाळणारच. न्यायदेवता म्हणतेय की कोणालाही आम्हाला रोखता येणार नाही, पण हे आम्हाला रोखत आहेत. म्हणजे मी सांगितलेलं षडयंत्र ते हेच ना. राज्य अस्थिर कोण करत आहेत?” असं मनोज जरांगे म्हणाले.
१५ सप्टेंबर रोजी आम्ही इथून निघणार आणि मुंबई जाऊन शांततेत उपोषण आणि आंदोलन करणार. त्यांना परवानगी द्यायची की नाही ते त्यांनी ठरवायचं. १९ ला आझाद मैदानावर लोकशाही मार्गाने शांततेत बेमुदत उपोषण होणार. आजपासून सलाईन-पाणी सर्व सोडलं. आता डॉक्टरांना सांगितलं होतं की या सलाईन लावायला. पण आता सलाईन, पाणी, उपचार सर्व बंद करत आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.
