Manoj Jarange Patil vs Dhananjay Munde : “धनंजय मुंडेंनी माझ्या घातपातासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली आहे”, असा गंभीर आरोप मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच, या प्रकरणातील आरोपींनी पोलीस चौकशीत सगळं काही सांगूनही जालन्याचे पोलीस अधीक्षक धनंजय मुंडे यांना ताब्यात का घेत नाहीत? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. दुसऱ्या बाजूला, मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावर माजी मंत्री, तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आमदार धनंजय मुंडे म्हणाले, “या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे मी यावर काहीच बोलणार नाही.”

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “धनंजय मुंडे यांनी माझा घातपात करायचं ठरवलं आहे. या प्रकरणातील तीन आरोपींनी पोलिसांना तसं स्पष्ट सांगितलं आहे. चौकशीत त्यांनी सगळा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या घातपातासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पाय धरले. मला या चौकशीपासून वाचवा अशी विनंती केली. त्यामुळे मुंडेंना अटक झाली नाही.”

मनोज जरांगेंचं अजित पवारांना आवाहन

“धनंजय मुंडे यांना माझ्या अंगावर गाडी घालायची आहे. त्यांनी मैदानात यावे. मी सुद्धा तयार आहे”, असं आव्हानही जरांगे पाटील यांनी दिलं आहे. यासह त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन केलं आहे की “तुम्ही या पापात सहभागी होऊ नका.”

धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

दरम्यान, मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. ते म्हणाले, “मला यावर काहीच बोलायचं नाही. सरकारने या प्रकरणी एसआयटी (विशेष तपास पथक) नेमली आहे. एसआयटी पारदर्शकपणे काम करत आहे.”

दरम्यान, जरांगे पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आरोप केला आहे. “फडणवीस देखील अजित पवारांप्रमाणे धनंजय मुंडेंना सांभाळून घेत आहेत”, अशा शब्दांत जरांगे पाटलांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस देखील धनंजय मुंडेंना सांभाळत आहेत. माझं त्यांना सांगणं आहे की तुम्ही या क्रूर माणसाला सांभाळू नका . फडणवीस पूर्वी असे नव्हते. मात्र, आता ते क्रूर माणसांना पाठिंबा देत आहेत. फडणवीस पूर्वसारखे चांगले वागले तर गरिबांना न्याय मिळेल.”