Manoj Jarange Patil Dasara Melava 2024 : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा उपोषण आणि आंदोलन केलं. मात्र, अद्याप राज्य सरकारने त्यांच्या मागणीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. यातच आता दसऱ्यानिमित्त मनोज जरांगे पाटील यांचा श्री क्षेत्र नारायण गड, बीड येथे दसरा मेळावा पार पडला आहे. या दसरा मेळाव्यासाठी लाखो मराठा बांधव नारायण गडावर आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचा हा मेळावा महत्वाचा मानला जात आहे. या मेळाव्यातून मनोज जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे. “आपल्याला यावेळी उलथापालथ करावीच लागणार”, असं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात बोलताना केलं आहे.

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

“एवढी गर्दी या मेळाव्याला होईल असं वाटलं नव्हतं. या मेळाव्याच्या चारही बाजूला माध्यमांचे कॅमेरे फिरवा, समोरच्यांचा कार्यक्रम होईल. कधी वाटलं नव्हतं की आपण एवढ्या मोठ्या ताकदीने या ठिकाणी याल. मात्र, आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्यने आला आहात. या समुदायावर संस्कार आहेत. हा समुदाय कधीही मस्तीत वागला नाही. प्रत्येकाला सांभाळून घेण्याचं आणि साथ देण्याचं काम या समाजाने केलं. या समाजाने कधीही जातीवाद केला नाही. एवढं मोठं व्यासपीठ जर पुरत नसेल तर खरोखर तुमच्या समोर आज मला नतमस्तक व्हावं लागेल. एकदा जर तुम्ही साथ द्यायची ठरवलं तर तुम्ही पूर्णपणे साथ देता. मग तुम्ही हटत नाहीत. एकदा जर तुम्ही नाही म्हणाले तर मग साथ देतच नाहीत. आपण आज काही बोलणार नाही, मर्यादा पाळणार. जरी तुमची इच्छा असली बोलावं, पण मी आपल्या हिंदू धर्माची शिकवण आणि नारायण गडाची शिकवण पाळणार आहे. एकमेकांना समजून घेण्याची शिकवण आपल्याला दिलेली आहे. गडाचा आशीर्वाद ज्यांना ज्यांना मिळतो ते दिल्लीला सुद्धा झुकवतो. याआधी ज्यांना आशीर्वाद मिळाला त्यांनी दिल्लीला झुकवले. पण ते नंतर उलटले”, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

हेही वाचा : “धर्म अनेक आहेत, पण त्या सगळ्यांच्या वरचा धर्म भारताचा प्राण आहे”, सरसंघचालक मोहन भागवतांचं संघ मुख्यालयात भाष्य!

“महाराष्ट्रात एक लाट आली आणि उठाव झाला. मात्र, आपल्याला यावेळी उलथापालथ करावीच लागणार आहे. या शिवाय आपल्याकडे पर्याय नाही. आपल्या नाकावर टिचून जर कुठले निर्णय होणार असतील आणि राज्यातील मराठा समाजावर अन्याय होणार असेल तर आपल्याला या समाजाच्या लेकरांसाठी आपल्याला लढावच लागणार आहे. शेवटी आपल्याला आपला समुदाय आणि शेतकरी महत्वाचा आहे. मला तुमच्याकडून एकच वचन पाहिजे. जर आपल्या राज्यातील जनतेवर अन्याय झाला आणि मी सांगितलं आपल्याल हेच करायचं तर तेच करा, हेच वजन मला आज तुम्ही द्या”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.

“हिंदू धर्माने आपल्याला अन्यायाविरोधात लढायला शिकवलं आहे. अन्याय होत असेल तर उठाव करायचा हे शिकवलेलं आहे. आपल्या लेकरांना न्याय मिळावा, त्यासाठी हा उठाव सुरु आहे. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी आम्ही करत आहोत. त्यासाठी आम्ही गेल्या १४ महिन्यांपासून आरक्षणासाठी झुंजत आहोत. मात्र, हे म्हणत आहेत की, तुमच्या आरक्षणाला धक्का लागत आहे. मात्र, आम्ही क्षत्रीय मराठे आहोत, कधीच गप्प बसत नाहीत. कारण आम्ही क्षत्रीय मराठे आहोत. माझ्या एखाद्या शब्दामुळे मराठा समाजाला दुष्परिणाम भोगावे लागतील त्यामुळे मी जास्त बोलत नाही”, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

आचारसंहिता लागेपर्यंत धीर धरा

“तुमच्या सर्वांच्या मनात जे आहे तेच मी करणार आहे. मी जाता जाता एवढंच सांगतो. आचारसंहिता लागल्यानंतर मी तुम्हाला आपली मुख्य भूमिका सांगणार आहे. मात्र, आचारसंहिता लागेपर्यंत आपल्याला धीर धरायचा आहे. सरकारला सांगतो सुट्टी नाही. पण आचारसंहिता लागल्यावर तुम्ही सर्वांनी माझं ऐकायचं. ते काय करतात हे सगळं आपण पाहायचं. त्यानंतर त्यांनी सगळं करेपर्यंत आपण कोणताही निर्णय घ्यायचा नाही. त्यांनी सगळं केल्यावर आपण निर्णय घ्यायचा. तुमच्या मनात जे आहे, तेच पूर्ण करायची जबाबदारी माझी आहे. तुमची शान मी वाढवल्याशिवाय राहणार नाही”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

Story img Loader