Chhagan Bhujbal on Rohit Pawar : मराठा आरक्षणाचं घोंडगं अद्यापही भिजत आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरलाय. मात्र, सरकारपक्षातील छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला असून आंदोलक मनोज जरांगे यांच्यावरही सातत्याने गंभीर आरोप केले आहेत. मराठा आरक्षणासाठी चालू असलेले आंदोलन हे शरद पवारांनी सुरू केल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी यापूर्वीही केला होता. आता त्यांनी रोहित पवार आणि राजेश टोपेंचं नाव घेऊन मनोज जरांगेंवर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.
“मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला ज्यावेळेला सुरुवात झाली, दगडफेक झाली, लाठीमार झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरांगे तिथून निघून गेला होता. रात्री २ वाजता राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची नावे पुढे आली. रोहित पवार आणि राजेश टोपेंनी तिथे पुन्हा आणून बसवलं. मग पवार साहेब तिथे गेले. उद्धव ठाकरेही गेले. खरी माहिती शरद पवार आणि उद्ध ठाकरेंनाही माहिती नव्हती”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“पोलिसांवर दगडफेक झाली. ८० महिला आणु पुरूष पोलीस कर्मचारी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. नंतर स्वतःच्या संरक्षणासाठी हा लाठीहल्ला करण्यात आला. हे दोन्ही नेते गेल्यामुळे आंदोलनाची माहिती जनतेच्या पुढे आली, त्याचा फायदा जरांगेंना मिळाला, यात दोघांचा हात आहे असं सर्वांचं म्हणणं आहे”, असा आरोपही छगन भुजबळ यांनी केला.
हेही वाचा >> सोलापूर: आरक्षणप्रश्नी राजेंद्र राऊत यांचे बार्शीत ठिय्या आंदोलन सुरू
रोहित पवारांनीही दिलं प्रत्युत्तर
“सामाजिक प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ता लढत असताना राजकीय आरोप करून सामजिक कार्यकर्त्याची बदनामी करणे आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याला शोभत नाही. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर २ सप्टेंबर रोजी सरकारने अमानुष लाठीचार्ज केल्याने त्या भागात नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण होते, त्यामुळे मी स्वतः रात्री अडीच वाजता जाऊन त्या भागातील हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली, धीर दिला. जरांगे पाटील यांच्या कुटुंबाला धीर दिला, यात चुकीचे काय आहे का? ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवणाऱ्या भाजपला टोकाचा विरोध करणारा आपल्यासारखा जेष्ठ नेता आज माझ्यावर तसेच राजेश टोपे साहेबांवर ‘ज्यांच्या सांगण्यावरून आरोप करत आहेत त्याच नेत्याच्या’ हातात आज गृहमंत्रालय आहे. त्यामुळे त्यांना सांगून माझ्यावरील आपण केलेले आरोप सिद्ध करून माझ्यावर कायदेशीर कारवाई करायला सांगा, हे माझे आपणास जाहीर आव्हान आहे. असो! हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. त्यामुळे दोन समाजात भांडणे लावण्याचा उचललेला विडा खाली ठेवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुखाने नांदू द्या तसेच भाजप नेत्यांच्या नादाला लागून महाराष्ट्राची वाट लावण्यापेक्षा जनतेच्या खऱ्या समस्यांकडे लक्ष द्या, ही विनंती”, असं आवाहन रोहित पवारांनी केलं.
आदरणीय भुजबळ साहेब,
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 14, 2024
सामाजिक प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ता लढत असताना राजकीय आरोप करून सामजिक कार्यकर्त्याची बदनामी करणे आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याला शोभत नाही. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर २ सप्टेंबर रोजी सरकारने अमानुष लाठीचार्ज केल्याने त्या भागात…
मराठा आरक्षणाची स्थिती काय?
एखाद्या जाती-जमातीला मागास ठरवून आरक्षण देण्याचा अधिकार केंद्र किंवा राज्य सरकारऐवजी राष्ट्रपतींना देणारी १०२वी घटनादुरूस्ती सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करताना वैध ठरवली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, १०५वी घटनादुरूस्ती करण्यात आली. परंतु, या घटनादुरूस्तीने राज्य सरकारला केवळ एखाद्या जाती-जमातीचे मागासलेपण तपासण्याची आणि त्याबाबतची माहिती गोळा करण्याचे मर्यादित अधिकार दिले आहेत. असे असताना त्याचा चुकीचा अर्थ लावून आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याबाबतचा कायदा केला, असा दावा मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात केला.