Manoj Jarange: पाटोद्यात मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची तपासणी वैद्यकीय पथकाने केली. जरांगेंचा रक्तदाब आणि साखरेची पातळी कमी झाल्याची माहिती बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश सोळंके यांनी माध्यमांशी बोलताना दिली. उपाचारासाठी परवानगी दिल्यानंतर जरांगेंना डिहायड्रेशन कव्हर करण्यासाठी सलाईन लावल्याचेही सोळंके यांनी सांगितले. दरम्यान, केवळ सलाईनवरती मुंबईला प्रवास करता येणार नाही अशा स्थितीत रुग्णालयात ॲडमिट होण्याचा सल्ला आम्ही दिला आहे, असेही सोळंके यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

मराठा आरक्षणाशी निगडीत विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. जरांगे पाटील यांचा ताफा पाटोद्यात दाखल झाला आहे. पण, जरांगे पाटील यांनी प्रकृती खालावली असल्याने वैद्यकीय पथकाने त्यांनी उपचार करण्याची परवानी मागितली. “उपचाराची परवानी मिळाल्यानंतर जरांगेंना डिहायड्रेशन कव्हर करण्यासाठी सलाईन लावण्यात आले आहे. लघवीच्या चाचणीतून पुढील निर्णय घेता येईल, पण अशा स्थितीत त्यांना रुग्णालयात ॲडमिट करण्याची गरज आहे”, असे डॉ. सतीश सोळंके यांनी सांगितले.

१३ पैकी १२ मागण्या मान्य – चंद्रकांत पाटील

जरांगे पाटील एकटेच मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. बीडमध्ये पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पण, त्यांची प्रकृती खालावली असल्याने तपसणीची विनंती वैद्यकीय पथकाने केली मात्र, सकाळी त्यांनी तपासणीला नकार दिला. दरम्यान, दुपारी अखेर जरांगे पाटील यांनी उपचारास परवानगी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य झाल्याचे सांगितले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा पुनरुच्चार केला.

आंदोलन थांबविण्याची मागणी

“ऐन गणेशोत्सवात मुंबईत जाऊन, तिथं जनजीवन विस्कळीत करु नका. सामान्य मुंबईकरांचा रोष ओढावून घेऊ नका. सगळे तुम्हाला मानतात. गणेशोत्सव आणि तृमची प्रकृती विचारात घेऊन हे थांबवलं पाहिजे”, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. जरांगे पाटील प्रवास करत असलेल्या डिफेंडर गाडीची तपासणी पोलिसांनी केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, आझाद मैदानावरील आंदोलनाबाबतची माहितीही पोलिसांनी मागवली आहे. वाहनं, स्वयंसेवकांची संख्या यासह इतर तपशील पोलिसांनी मागितल्याची माहिती समोर आलीय.