Godhadi and Defender in Maratha movement: बहुसंख्याक असणे ही शक्ती असते ? – राजकारणासाठी जेवढी गर्दी अधिक तेवढी ताकद जास्त. ही ताकद जेव्हा दुसऱ्या समूह भावना दाबण्यासाठी किंवा चिरडण्यासाठी वापरले जाते तेव्हा बहुसंख्याकवादाचा एक खेळ रंगतो. या खेळात सत्तेचा दर्प असतो. किंबहुना गर्दीच्या जीवावर वाटाघाटीची शक्ती माेजली जाते. या खेळ जेव्हा वारंवार खेळला जातो तेव्हा तो ‘फॅसिझम’मध्ये कधी रुपांतरित होतो, हे कळत नाही. यावेळी तो तसाच आहे, असे नाही. पण काही प्रतिके दंडातील बेटकुळी दाखवणारे आहेत. संख्यादर्शक शक्ती दाखवणारेही आहेत.

अलिकडच्या मराठा आरक्षण आंदोलनात शक्तीदर्शक अशी अनेक प्रतिके होती. गेल्या तीन वर्षात ८९ दिवसाचा उपवास करताना मनोज जरांगे यांनी एकच एक गोधडी अंगावर का घेतली असेल, असा एक प्रश्न समाजमाध्यमावर ठसठशीतपणे उमटला खरा. त्याच वेळी ते वापरत असणारे डिफेंडर गाडीची चर्चाही झाली. जर समाज म्हणून आपल्या नेत्याला अलिशान मोठी गाडी वापरण्यास देता येऊ शकते तर मग त्याच समाजाने गोधडी का बदल नसेल? – समूह मनावर परिणाम करणारी काही प्रतिके जपावी लागतात , आंदोलक जरांगे पाटील यांची समाज म्हणून असणारी शक्ती दाखविण्यासाठी डिफेंडर ही गाडी आणि ती ताकद जेव्हा वापरायची असते तेव्हा समूह मनावर प्रभाव निर्माण करावे लागतात. तेव्हा गोधडी. या अर्थाने गोधडी हे जरांगे यांच्या आंदोलनाची एका अर्थाने प्रभावक. आमचा नेता साधा आहे, तो सत्ताधाऱ्यांना हाती लागत नाही, या भावनेचे गोधडी प्रतिनिधीत्व करते. पण ही गोधडी अंगावर घेताना विधानसभा निवडणुकीमध्ये ताकद उभी करू शकतो का, याचीही चाचपणी झाली होती, ही बाब कोण कसे विसरेल ? याचा अर्थ घोंगडीतून निर्माण होणारी जात एकत्रिकरणाची भावना कोणत्याही क्षणी राजकीय पटलावर येऊ शकते, या भीतीतून जरांगे जेव्हा आंदोलन करतील तेव्हा वाटाघाटीसाठी मंत्रीच धावपळ करताना दिसत होते. २०२३ ते २०२६ या कालावधीमध्ये जरांगे यांच्या आंदोलनामध्ये आणखी एक प्रतीक वापरले गेले. तेही शक्तीदर्शक होते. ‘ जेसीबी ’ हे ते प्रतीक. आमच्या जातीची इतर मागास प्रवर्गात गणना करावी या मागणीसाठी गावोगावी शक्ती गोळा करणाऱ्या आंदालक मनोज जरांगे यांच्यावर उधळला जाणार फुले आणि गुलाल जेसीबीतून अंगावर टाकला जात असे. वाळू उपसा करण्यासाठी, तलावातील माती काढण्यासाठी किंवा बांधकामामध्ये वापरले जाणारे हे यंत्र हे नव्या शक्तीचे प्रतीक होते. प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात स्वागताचा जेसीबी पॅटर्न हेही प्रतीक होते. गर्दी आणि ताकद यांचा सहसंबंध असा दृश्यस्वरुपात दिसतो.

बुलेट फेरी हे राजकीय पटलावरील एक महत्त्वाचं निदर्शक. हीच गाडी का असेल ? १८५७ च्या बंडात जी काडतुसे वापरली गेली ती बनवणाऱ्या कंपनीचे नाव होते रॉयल एन्फिल्ड. ती कंपनीपुढे जेव्हा दुचाकी उत्पादनात उतरली तेव्हा ते वाहन हे सत्ताधाऱ्याची मानसिकता दर्शवण्यासाठीचे प्रतीक मानले जाते. एखाद्या वाहनाला ‘ बुलेट ’ अशी ओळख मिळते ती अशी. या वेळी मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेल्या वर्गाने ऑटोरिक्षाची फेरी काढली. दीड – दोन हजार रिक्षा आणि त्याचे चालक हा आरक्षण मागणाऱ्यांचा आर्थिक स्तर सांगण्यास पुरेसा आहे. काही दृश्य विरोधाभास दाखवतात. एका मोठ्या काळ्या रंगाच्या गाडीतून मनाेज जरांगे मुंबईकडे चालले आहेत. मग त्यांना भूक लागते आणि ते गाडीतून एक चपाती आणि शेंगांची चटणी खातात. हा साधेपणा सांगणारे दृश्य खऱ्या अर्थाने आंदोलकांना प्रेरणा देण्यासाठी पुरेसे असते. मराठवाड्यातील शेती आणि शेतकरी यांची अवस्था बिकट आहेच. पणी जरांगे ज्या भागात आंदोलन करतात या भागातील म्हणजे गोदापट्ट्यातील शेतकऱ्यांची अवस्था अधिक संपन्न आहे. पण नदीचा किनारा सोडला की स्थिती बिघडत जाते .जगण्याचा आधार कमी होतात आणि आरक्षण हा आधार वाटू लागतो. कारण शेती प्रश्नात दडले आहे. शेतीपेक्षा नोकरदाराला प्रतिष्ठा अधिक म्हणून शेतकरी नवरा नको, हे चित्र आता रुजले आहे. म्हणूनच गावोगावी लग्न न झालेल्यांची संख्या वाढते आहे. हे सारे टाळायचे असेल तर स्थलांतर अपरिहार्य. परिणामी घरात बागायती शेती आणि मुलगा मॉलमध्ये नोकरीला. अगदी पतसंस्थेत नाेकरीला असेल तरी मॅनेजर म्हणून का लग्न लावून देता येते, हे आता कळाले आहे. असे अपमान गावोगावी पचवून अनेकाचं मन घट्ट झाले आहे. परिणामी शेतीवरील संकट अधिक गहिरे झाले की आरक्षणाचा आवाज उंचावतो. किंवा उंच आवाजाला अधिक प्रतिसाद मिळतो.

आंदोलनाती एकीच्या घोषणा ताकद आणि संख्या मोजण्यास भाग पाडत असतात. ‘ एक मराठा – लाख मराठा’ ही घोषणा शक्तीदर्शक. ही शक्ती संख्येत समावली आहे, असा याचा अर्थ. पण ही शक्ती फक्त गर्दीमध्ये नाही. ती सर्वसत्तास्थांनांवर आहे. फक्त सध्या यात राज्याच्या राजकारणातील प्रमूख पद नाही, हे शल्यही प्रतीत होणारे. त्यातूनच राधाकृष्ण विखे यांच्या भाषणा दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख येताच हुर्रयो करण्याचा प्रयत्न झाला का ? दुसरी एक घोषणाही प्रतिकाच्या पातळीवर तपासली पाहिजे. ती म्हणजे ‘ पाटील, पाटील ’ जेव्हा एखादा मोठी घोषणा होते किंवा टीका तेव्हा प्रतिसादासाठी ही घोषणा दिली जाते. या घोषणेत गावगाडा चालवणारा प्रमूख व्यक्ती असा भाव अध्याहृत आहे. तो प्रमूख व्यक्ती आम्हाला ‘ मागास ’ ठरावा यासाठी गेल्या तीन वर्षात ११ वेळा उपोषण केले. ८९ दिवसाच्या उपोषणात ‘आम्ही सारे जरांगे ’ अशीही घोषणा होती. हा अण्णा आंदोलनाचा प्रभाव म्हणता येईल. पण अण्णाच्या आंदोलनानंतर कोणी अण्णा हजारे झाले नाहीत. किंबहुना त्यांनी दिलेल्या आंदोलनातील माहिती अधिकाराचा जो काही दुरुपयोग केला गेला तो मूळ तत्वाला हरताळ फासणाराच ठरला. आता जरांगे आंदोलनात आम्ही सारे जरांगे म्हणणाऱ्या आंदाेलकांना आम्ही देखील ‘ संघर्ष योद्धाच ’ आहोत असे सांगायचे असते. यासाठी लागणारा ऐवज हळुहळू जमा होत राहतो. तो ऐवज जमा झाला नाही तर त्याला एक टाेकदारपणा दिला जातो. पहिल्या टप्प्ययात छगन भुजबळ, दुसऱ्या टप्प्यात चंद्रशेखर बावनकुळे आज त्यात राधाकृष्ण विखे यांची भर पडू लागली आहे. लोकशाहीत टोकदार प्रश्न विचारलेच पाहिजेत, पण तो टाेकदारपणा खरच लाभ मिळवून देतो आहे का, हेही तपासावे लागेल. या वर्षी ओबीसीचा कट ऑफ मागासांचा विशेष प्रवर्गापेक्षा अधिकचा होता, हेही विसरता येत नाही. म्हणून केवळ आरक्षण नाही तर बेरोजगारीसाठी मुले स्वतंत्रपणे रस्त्यावर उतरू लागले आहे. यातील एक चित्र मोठे विलक्षण आहे. कॉक्रोच जनता पार्टी स्थापन करणारा अभिजीत दिपके सारखा तरुण शाळा सुधारा असा आग्रह धरत आहे आणि सत्तास्थानी अधिक संख्येने असणारा मराठा समाज आरक्षणासाठी लढतो आहे.