मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. “मराठा समाजाला वेड्यात काढण्याचे काम सुरू असून, आता आरपारची लढाई लढण्याची वेळ आली आहे,” अशा कडक शब्दांत जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला. येत्या २९ ऑगस्टपासून पुन्हा एकदा राज्यव्यापी आणि ‘शेवटचे निर्णायक आंदोलन’ सुरू करण्याची घोषणा त्यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथून केली.

सरकारला २८ ऑगस्टपर्यंत हैदराबाद गॅझेटिअरनुसार मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्रे देण्याची मुदत देत जरांगे पाटील यांनी महायुती सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढवली आहे.

‘५८ लाख नोंदी मिळूनही प्रमाणपत्रे का नाहीत?’

पत्रकार परिषदेत आणि उपस्थितांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार ताशेरे ओढले. ते म्हणाले, “गेल्या तीन वर्षांपासून समाजातील लेकरांसाठी आमचं रक्त जळतंय. राज्यात तब्बल ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. हैदराबाद गॅझेटिअर सादर करूनही सरकार मराठ्यांना प्रमाणपत्रे का देत नाही? आधी स्थानिक चौकशी अहवाल आणला आणि आता प्रमाणपत्रे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मराठा समाजाला टार्गेट केलं जात असून आता तुकडा पडल्याशिवाय माघार घेणार नाही.”

ज्या मराठा बांधवांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांनी तात्काळ अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

‘९ मंत्र्यांचा विरोध; २९ ऑगस्टला नाव जाहीर करणार!’

मराठा समाजासाठी स्वतंत्र ‘मराठा कल्याण मंत्रालय’ स्थापन करण्याची मागणी जरांगे यांनी लावून धरली. या मागणीला मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचा विरोध असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

“ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय आणि उपसमिती असू शकते, तर मराठ्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला काय अडचण आहे? महायुती सरकारमधील ९ मंत्र्यांनी मराठ्यांना स्वतंत्र मंत्रालय देऊ नका असा सल्ला दिला आहे. त्या ९ मंत्र्यांची नावे मी येत्या २९ ऑगस्ट रोजी जाहीर करणार आहे,” असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा; सरकारी योजनांवरून संताप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले:

  • सवलती कागदावरच: सरकारने ओबीसींप्रमाणे सर्व सुविधा मराठा विद्यार्थ्यांना लागू केल्याचे जीआर काढले, पण प्रत्यक्षात शाळा-कॉलेज स्तरावर एकाही योजनेची अंमलबजावणी झालेली नाही.
  • सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ: सारथी संस्थेच्या योजना बंद पाडल्या जात असून, अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज घेतलेल्या तरुणांचे व्याज परतावे थकल्यामुळे त्यांचा ‘सिबिल’ स्कोअर खराब झाला आहे.
  • भरती आणि नियुक्त्या: निवड झालेल्या मराठा तरुण-तरुणींना शासकीय सेवांमध्ये नियुक्त्या दिल्या जात नाहीत. फडणवीस साहेब, मराठ्यांच्या लेकरांवरच हा दुजाभाव का?

२८ ऑगस्टपर्यंतचा अल्टीमेटम, २९ ऑगस्टला गावागावातून एल्गार

२८ ऑगस्टपर्यंत हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थान, कोल्हापूर, औंध आणि पुणे गॅझेटीयरनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे दिली नाहीत, तर २९ ऑगस्टपासून आमरण व निर्णायक आंदोलन सुरू होईल.

“हे आंदोलन पक्षीय सीमांच्या पलीकडचे आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप- महायुतीतील सर्वच नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मुलांच्या भविष्याचा हा प्रश्न आहे. त्यामुळे २९ ऑगस्टला गावागावातील मराठा बांधव एकवटून रस्त्यावर उतरेल,” असा स्पष्ट संदेश जरांगे यांनी दिला. तसेच आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.