कर्जत : यापूर्वी मराठवाड्यातील एकाही मराठा बांधवाला ओबीसी दाखला मिळत नव्हता. आता तब्बल ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत. हळूहळू मराठवाड्यातील प्रत्येक मराठा समाजातील बांधवांना ओबीसी दाखला मिळेलच त्यामुळे टीका करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही, असे प्रतिपादन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जारंगे पाटील यांनी आज, शनिवारी कर्जतमध्ये पत्रकारांशी बोलताना केले.

मनोज जरांगे पाटील यांचे आज सायंकाळी कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने समन्वयक रावसाहेब धांडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. नितीन तोरडमल यांच्यासह कार्यकर्त्यांनी स्वागत केले. फटाक्यांची आतिषबाजी करत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी रावसाहेब धांडे यांनी कर्जतमधील शिवजयंतीच्या उत्सव कार्यक्रमाचे निमंत्रण जरांगे पाटील यांना दिले. शिवजयंती उत्साहात मात्र शांतपणे साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुंबई येथे जे आंदोलन झाले ते अतिशय निर्णायक होते. या आंदोलनाने मोठे यश आम्हाला दिले. चार-दोन टीका करतात मात्र त्यांच्या टिकेकडे मी लक्ष देत नाही. तब्बल ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत. यामुळे या गॅजेटला अतिशय महत्त्व आहे.

पूर्वी मराठा समाजाला ओबीसी दाखला मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, बऱ्याचवेळा मोठ्या रकमा देखील दाखला मिळवण्यासाठी दिल्या जात होत्या. मात्र आपल्या आंदोलनामुळे मोठे यश मिळाले. टीका करणारे या ५८ लाख नोंदींवर काहीच बोलत नाहीत. आज जरी संथ गतीने दाखले मिळत असली तरी मराठवाड्यातील सर्व मराठा बांधवांना ओबीसीचे दाखले मिळणार आहेत. त्यामुळे अशा चार-दोन जणांकडे फारसे लक्ष देऊ नका, असे जरांगे म्हणाले.

टिपू सुलतानच्या नावावर राजकारण

मालेगाव येथी उपमहापौरांच्या दालनामध्ये टिपू सुलतान यांची प्रतिमा लावण्यात आली. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता, टिपू सुलतान एक शौर्य गाजवणारे योद्धे, भूमिपुत्र होऊन गेले. त्यामूळे शौर्याचे लक्षण म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघायला पाहिजे, असे वक्तव्य केले.

यासंदर्भात बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांची बरोबरी कोणाशी होणार नाही आणि होऊ शकत नाही. त्यांच्यावर कोण काय बोलले हे मी ऐकले नाही. मात्र जर ते तसं बोलले असतील तर केवळ त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठीच अशा पद्धतीचे उद्गार नेतेमंडळी काढतात.