Manoj Jarange : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राजकीय नेत्यांचे महाराष्ट्रात दौरे, मतदारसंघाचा आढावा, बैठका, मेळावे, सभा असं सर्व चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यातच महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? याबाबतही खलबतं सुरु आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दाही तापलेला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. या मागणीसाठी त्यांनी अनेकदा आंदोलन आणि उपोषणही केलं. मात्र, राज्य सरकारने याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला आहे. यातच सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरु आहे. या रॅलीच्या माध्यमातून मराठा समाजाला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. "आम्ही जरी काही जागा निवडून आणू शकलो नाहीत, तरी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात सुपडा साफ करणार आणि मुंबईत १९ जागांचा करेक्ट कार्यक्रम करणार", असं मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : Devendra Fadnavis : ‘मनोज जरांगे तुम्हालाच का टार्गेट करतात?’ देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर म्हणाले; “त्यांना..” मनोज जरांगे काय म्हणाले? मनोज जरांगे पाटील जनजागृती शांतता रॅलीमध्ये बोलताना म्हणाले, "महाराष्ट्रामधून १७ ते १८ टक्के मराठा समाज मुंबईमध्ये गेलेला आहे. मग आपण तेथे उमेदवार निवडून आणू शकलो नाहीत, तरी तेथील १९ जागांचा कार्यक्रम केला म्हणून समजा. म्हणजे पाडलेच म्हणून समजा. आपण तेथेही शोध मोहीम सुरु केलेली आहे. आता कोकणातील काही भाग अजून बाकी राहिला आहे, तर मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हे तीनही विभाग एका बाजूला आहेत. या तीनही विभागात यांचा सुपडा साफ होणार आहे", असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. …तर राजकारणात आल्याशिवाय पर्याय नाही "मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याची मागणी केलेली आहे. पण मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर राजकारणात आल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. त्यामुळे आता मराठा समाजाची कसोटी लागलेली आहे. याबाबत २९ ऑगस्ट रोजी महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत जे ठरेल त्यामागे ठाम उभे राहा", असं आवाहनही मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं. दुसऱ्या टप्प्यातील रॅलीचा समारोप मनोज जरांगे यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यात जनजागृती शांतता रॅली सुरु केलेली आहे. या रॅलीचा पहिला टप्पा मराठवाड्यातील जिल्ह्यात पार पडला. यानंतर आता या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. आता या शांतता रॅलीचा दुसऱ्या टप्पाचा समारोप नाशिकमध्ये होणार आहे.