Manoj Jarange On Maratha OBC Reservation : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चांगलांच चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे केलेली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी अनेकदा उपोषणही केलं. मात्र, मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. यातच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला ओबीसींनी विरोध केला असल्यामुळे पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. अशातच विधानसभेची निवडणूक जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे काही उमेदवार पाडण्याचा इशाराही अनेकदा दिला. यानंतर आता मनोज जरांगे यांनी गुप्त बैठकांबाबत मोठं विधान केलं आहे. "राजकारणात काही गोष्टी उघड करायच्या नसतात, तर संकेत पाळायचे असतात", असं सूचक विधान मनोज जरांगे यांनी टिव्ही ९ मराठीशी बोलताना केलं. त्यांच्या या विधानाचा अर्थ काय? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. हेही वाचा : Ajit Pawar Group : “…मग तेव्हा ते कपट कोणाचं होतं?” संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेला अजित पवार गटाचं प्रत्युतर! मनोज जरांगे काय म्हणाले? तुमच्याही काही गुप्त बैठका असल्याच्या चर्चा आहेत. या प्रश्नांवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "राजकारणात काही गोष्टी उघड करायच्या नसतात. तसेच काही संकेत असतात ते पाळायचे असतात. राजकारणातला संकेत ज्याला कळतो तो यशस्वी होतो. त्यामुळे आमच्या बैठका आहेत, पण त्या कशाच्या बैठका आहेत? ते येणाऱ्या ५ ते ६ दिवसांनी आम्हीच जाहीर करणार आहोत. सामाजिक न्यायासाठी ही राजकीय लढाई आहे. त्यामुळे आमचा नाईलाज आहे", असं सूचक विधान मनोज जरांगे यांनी केलं. राजकारणातील गुप्त बैठका काय असतात? हे तुम्हालाही समजायला लागलं असल्याची टीका केली जाते, यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "आम्हाला या गोष्टी सत्ताधारी आणि विरोधकांनी शिकवल्या आहेत. कारण आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की आम्हाला राजकारणात जायचं नाही. आजही आम्ही सांगत आहोत की आम्हाला राजकारणात जायचं नाही. मात्र, आमचं आरक्षण आम्हाला द्या. राजकारण तुमचं तुम्हाला लखलाभ. आरक्षण दिलं तर मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. या शब्दाचा अर्थ सत्ताधारी लोकांनी समजून घ्यावा. अन्यथा पश्चातापाशिवाय तुमच्या हातात काहीच राहणार नाही", असं इशाराही मनोज जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. दरम्यान, याचवेळी मनोज जरांगे यांनी आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत त्यांच्यावरही टीका केली.