मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज हिंगोलीत समाजबांधवांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "आरक्षण मिळालं नाही तर सरकारला आपली ताकद दाखवून देऊ. मी लोकसभा निवडणुकीत 'पाडा' (ठराविक उमेदवारांना पराभूत करा) म्हटल्यावर त्यांचं बरंच नुकसान झालं. आता मी जाहीर आव्हान दिलंय. येत्या १३ जुलैपर्यंत आरक्षणाचा तिढा सुटला नाही तर मी उमेदवारांची नावं घेऊन त्यांना पाडायला सांगणार आहे." यावेळी जरांगे पाटील यांनी सांगितलं की त्यांच्या 'पाडा' या शब्दाची सरकारला भिती आहे. सरकारमधील मंत्री त्यांना विनंती करतात की निवडणुकीत कोणालाही पाडा म्हणू नका. मनोज जरांगे पाटील म्हणाले, "अनेक मंत्री माझ्याकडे येऊन मला म्हणतात की पाटील तुम्ही निवडणुकीत काहीही म्हणा, परंतु 'पाडा' म्हणू नका. अलीकडेच एक मंत्री माझ्याकडे आले होते. ते मला म्हणाले, पाटील तुमच्याकडे दुसरा शब्द नाही का? मी विचारलं कोणता शब्द? तर ते म्हणाले, पाडा या शब्दाऐवजी दुसरा कुठला शब्द नाहीये का? तुम्ही पाडा म्हटलं की काळजात धस्स होतंय. तुम्ही आमचे उमेदवार पाडा म्हणाला नाहीत तरी देखील त्या शब्दाने अनेकांना घाम फुटतो. त्यामुळे दुसरं काहीतरी म्हणा." मंत्र्याबरोबर झालेला संवाद सांगत मनोज जरांगे पाटील म्हणाले, "आपल्या 'पाडा' या एका शब्दाने लोकांची किती फजिती झाली आहे. उद्या जर सगळ्या मराठ्यांनी नाव घेतलं (उमेदवाराचं) तर तुमच्या नावाने मतंच मिळणार नाहीत." जरांगे-पाटील म्हणाले, मला किंवा माझ्या समाजाला, आमच्यापैकी कोणालाही राजकारणात यायचं नाही. आम्हाला केवळ सर्वसामान्य मराठा कुटुंबांचं भलं पाहायचं आहे. मराठ्यांची लेकरं मोठी व्हावीत, हाच आमचा उद्देश आहे. समाजाच्या विकासासाठी आरक्षण मिळायला हवं. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देणं हे एकमेव उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवलं आहे. आमची लेकरं मोठी व्हावी यासाठी आम्हाला आरक्षण हवं आहे. आमच्यापैकी कोणालाही राजकारण करायचं नाही, तशी कोणाची इच्छा देखील नाही. परंतु, आम्हाला कोणी राजकारणाकडे ओढलं तर तुमची फजिती होईल एवढं लक्षात ठेवा. हे ही वाचा >> “सामना अजून संपलेला नाही, कोण कोणाची विकेट घेतं हे…”; ठाकरे गटाचा मुख्यमंत्री शिंदेंना इशारा मनोज जरांगे यावेळी भावनिक होत म्हणाले, “मी उघड्यावर पडलो तरी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याच्या कामात मागे हटणार नाही. मराठा समाजाला मी मायबाप मानलं आहे. माझा समाज माझ्यासाठी सर्वकाही आहे. माझ्या समाजाने मला काहीही कमी पडू दिलेलं नाही. मात्र आपल्या समाजातील लोकांनीही मला दु:ख द्यायला नाही पाहिजे. माझी हात जोडून समाजाला विनंती आहे, मायबापा हो मी समजासाठी लढतोय. माझा समाज मोठा होईल म्हणून तुम्ही पाठिशी राहा.”