“महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार आमच्याबरोबर राजकारण करत आहे. आमच्या हक्काचं आरक्षण द्यायला टाळाटाळ करत आहे”, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली. जरांगे यांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये मराठा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला हजारो समाजबांधव उपस्थित होते. त्यांना संबोधित करताना जरांगे म्हणाले, “हे सरकार मराठा समाजातील केवळ पाच-दहा लोकांना, ओबीसींमधील पाच-दहा लोकांना मोठं करू पाहतंय आणि उर्वरित समाजाकडे दुर्लक्ष करतंय. मात्र आता त्यांचं हे राजकारण चालणार नाही. आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही." मनोज जरांगे पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना वाटतंय की मी मराठ्यांच्या काही नेत्यांना मोठं करेन, जातीकडे दुर्लक्ष करेन आणि कोणी काही बोलणार नाही. परंतु, त्यांना एक गोष्ट समजत नाहीये की समाजबांधव आता त्यांचं ऐकणार नाहीत. मराठ्यांनी त्यांना आता सांगितलंय तुम्ही नेत्यांना मोठं करा आणि त्यांनाच घेऊन फिरा, आम्ही तुम्हाला योग्य वेळी उत्तर देऊ. मी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा सांगू इच्छितो, तुम्ही आमचे शत्रू नाही, आम्हाला केवळ आमच्या हक्काचं आरक्षण द्या. मराठा समाजासाठी लढणारे कार्यकर्ते म्हणाले, मला पद नको, पैसे नको, मला फक्त माझ्या जातीला आरक्षण मिळवून द्यायचं आहे. माझी धडपड माझ्या जातीतील लोकांना दिसतेय म्हणून ते आता मला एकटं पडू देत नाहीत. मी देवेंद्र फडणवीस यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, अनेक वेळा मी हा प्रयत्न केलाय, आज पुन्हा एकदा करतो. फडणवीसजी तुम्ही आमचे शत्रू नाही, आम्ही तुम्हाला विरोधक मानत नाही, तुम्ही केवळ आम्हाला आमचं ठरलेलं आरक्षण द्या, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, कारण कुणबी आणि मराठा एकच आहेत. आम्हाला कुणबी जात प्रमाणपत्र द्या, त्यासंबंधीचं गॅझेट लागू करा. असं केल्यास आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू, मात्र तुम्ही हे न करता काड्या करत बसता. हे ही वाचा >> “लवकरच न्याय मिळणार”, पक्षफुटीच्या प्रकरणावरील सरन्यायाधीशांच्या ‘त्या’ टिप्पणीमुळे शरद पवार गटाच्या आशा पल्लवित मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले, तुमचे ते गिरीश महाजन, छगन भुजबळ चंद्रकांत पाटील, या लोकांना आरक्षणातलं काहीच कळत नाही. मराठ्यांची दोन-चार माकडं तुमच्याबरोबर असतात, ते मंत्रिपदासाठी तुमचं ऐकतात. मराठ्यांचं काहीही होऊ देत त्यांना काही फरक पडत नाही. तुमची ती चार माकडं मला सांगतात, आमच्या साहेबांना काही बोलायचं नाही. मी जे काय बोलतोय ते ऐकत असाल तर ऐका, मराठा समाजात सरकारविरोधात रोष पसरू लागला आहे. तुमचे चार लोक तुमच्या बाजूने बोलतात, कारण त्यांना निवडणुकीचं तिकीट पाहिजे, मंत्रिपद पाहिजे. मला तिकीट, मंत्रिपद, पैसे यातलं काहीच नको. मला केवळ माझ्या जातीला आरक्षण मिळवून द्यायचं आहे म्हणून मी त्यांच्या विरोधात आहे.