Manoj Jarange Patil Warns Government Over IAS Tukaram Mundhe Transfer : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे खूप चांगले काम करीत असून त्यांच्या भेसळविरोधी मोहिमेमुळे सामान्यांचे जीवन सुधारेल आणि शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळेल. त्यामुळे सरकारने उगाच त्यांच्या कामात अडथळा आणून बदलीच्या भानगडीत पडू नये, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली. तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा प्रयत्न झाल्यास आम्ही सरकारच्या मागे लागणार, असा इशाराही त्यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना दिला.

तुकाराम मुंढे यांनी २५ मे २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळखोर, गुटखा माफिया आणि नियमबाह्य औषध विक्रेत्यांविरोधात धडक मोहीम उघडली. अवघ्या काही दिवसांतच शेकडो आस्थापनांवर धाडी टाकून कोट्यवधी रुपयांचा माल जप्त केला असून अनेकांना अटक केली. दुधात भेसळ करणाऱ्यांची यापुढे कोणतीही गय केली जाणार नाही, असा सज्जड दम त्यांनी दिला आहे. त्यांच्या या मोहिमेमुळे भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. यादरम्यान समाजमाध्यमांवर मुंढे यांच्या बदली संदर्भात नव्याने चर्चा सुरू झाली आहे. कडक शिस्त, आकडेवारीवर आधारित निर्णय आणि नियमांचे तडजोडीशिवाय पालन ही अन्न व प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. त्यांच्या कारकिर्दीतील काही गाजलेल्या निर्णयांमुळे आजही अनेक विभागांमध्ये त्यांचे नाव चर्चेत असते. तुकाराम मुंढे यांची शासकीय सेवेत आतापर्यंत २५ वेळा बदली झाली आहे.

मनोज जरांगे पाटील नेमके काय म्हणाले?

कळंब मार्गे कोल्हापूरला जात असताना जरांगे यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे त्यांच्या बदलीसाठी राजकीय हालचाली सुरू असल्याच्या चर्चा कानावर येत आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, मनोज जरांगे पाटील यांनी मुंढे यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच सरकारने त्यांच्या बदलीचा विचार करू नये, असे स्पष्टपणे सांगितले. अन्नपदार्थांमधील भेसळ रोखल्यास सर्वसामान्य नागरिकांना फायदा होईल, तर दुधातील भेसळीवर नियंत्रण आल्यास शेतकऱ्यांच्या शुद्ध दुधाला योग्य दर मिळण्यास मदत होईल. त्यामुळे सरकारने त्यांच्या कामात अडथळे आणू नयेत, त्या भानगडीत सरकारने पडूच नये, अन्यथा आम्ही सरकारच्या विरोधात भूमिका घेऊ, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

तुकाराम मुंढे यांची धडक कारवाई

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून आतापर्यंत बंदी असलेला गुटखा आणि पानमसाला विक्री करणाऱ्या ३३ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी २५ एफआयआरदाखल करण्यात आले, २७ दुकाने सील करण्यात आली असून गुटखा वाहतूक करणारी ५ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या संघटित माफियांवर आता थेट ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याचे कडक निर्देश त्यांनी पोलिसांशी समन्वय साधून दिले आहेत. त्याशिवाय मंत्रालयाच्या आदेशानुसार ११ जून २०२६ रोजी बनावट औषध कंपन्या शोधण्यासाठी आणि औषधांच्या दर्जाची तपासणी करण्यासाठी मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय विशेष तपासणी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार, कोणत्याही रुग्णालयाला किंवा डॉक्टरांना त्यांच्याच संलग्न मेडिकलमधून औषधे घेण्याची सक्ती रुग्णांवर करता येणार नाही, असा कडक नियम त्यांनी लागू केला असून नियम मोडणाऱ्यांवर परवाना रद्द करण्याची कारवाई सुरू केली आहे. नुकतीच त्यांनी पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानक परिसरातील हॉटेल्स आणि टपऱ्यांवर अचानक धाड टाकून अस्वच्छता आणि नियमबाह्य अन्नपदार्थ विकणाऱ्या अनेक दुकानदारांना टाळे ठोकले होते.