सांगली : मराठ्यांच्या लेकरांच्या भवितव्याशी खेळू देणार नाही असे सांगत मराठ्यांच्या नोंदींना हात लावाल तर सरकारला भारी पडेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांनी दिला.

मराठा आरक्षणावर जनजागृती करण्यासाठी जरांगे सांगली दौऱ्यावर आहेत. काल रात्री आटपाडी येथे जाहीर सभा झाली यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मराठा समाजाच्या नोंदी रद्द करण्याचा प्रयत्न सुरू आहेत . महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट निशाणा साधताना, ‘बावनकुळे, तू बावनकुळे आहेस; आम्ही शहान्नवकुळी मराठे आहोत. मराठ्यांच्या लेकरांच्या भवितव्याशी खेळाल तर मराठ्यांचा दरारा काय असतो, हे दाखवून देऊ,’ असा इशारा त्यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारलाही त्यांनी धारेवर धरले. मराठा-कुणबी नोंदी, कुणबी प्रमाणपत्रे, ओबीसीतून आरक्षण, शिक्षण-नोकरीतील संधी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ या प्रश्नांवर सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

भवानी विद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या सभेला मराठा समाजबांधवांची मोठी गर्दी झाली होती. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत समाजबांधवांची उपस्थिती आणि ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी सभेचे मैदान अक्षरशः दणाणून गेले.

‘महसूल विभाग तुमच्याकडे आहे म्हणून मराठ्यांच्या नोंदींशी खेळण्याचा अधिकार मिळत नाही. मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याचा प्रयत्न का सुरू आहे? कोणाच्या आदेशाने हा प्रकार सुरू आहे?’ असा सवाल जरांगे-पाटील यांनी केला.

‘मराठ्यांच्या हक्काच्या नोंदींवर हात टाकला, तर हा डाव उधळून लावू. समाजात गैरसमज निर्माण करून आंदोलन कमजोर करण्याचे राजकारण आता चालणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला.