मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. १९ सप्टेंबरला ते मुंबईतल्या आझाद मैदानावर येऊन आंदोलन करणार आहेत. त्यासाठी ते आंतरवली सराटीतून निघाले आहेत. त्यांचा पहिला मुक्काम पाटोदा या ठिकाणी होता. मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान मनोज जरांगे यांनी पाटोद्याहून निघताना मला समाजासाठी मरू द्या असं भावनिक आवाहन केलं. त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं.
मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक असून, पाटोद्यात डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. “रोज जर माझं असं झालं तर मी आठ दिवसात मरून जाईल, मला मुंबईत जाऊन मरू द्या.” असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. मात्र, तरीही आरक्षण महत्त्वाचे असल्याचे सांगत, समाजाच्या कल्याणासाठी एक बळी द्यावाच लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला गोळ्या घालून मारण्याचे षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोपही जरांगे पाटील यांनी केला. समाजाच्या लेकरांसाठी आपण बळी द्यायला तयार असल्याचे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. पाटोद्यात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मनोज जरांगेचे वडीलही झाले भावूक
मनोज जरांगे रात्री दोनच्या सुमारास पाटोद्यात पोहोचले. तरीही त्यांना पाहण्यासाठी हजारो मराठा बांधवांनी पाटोदा चौकात गर्दी केली होती. त्यामुळे हा संपूर्ण परिसर गर्दीने भरुन गेला होता. याठिकाणी मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला. रात्री अडीच वाजेपर्यंत त्यांनी सभा देखील घेतली. सभा संपल्यानंतर पहाटे तीन वाजता मनोज जरांगे यांचे वडील रावसाहेब जरांगे यांनी त्यांची भेट घेतली. गेल्या १९ दिवसांपासून उपोषण सुरू असल्याने मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता सलाईन लावून घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती आणखी ढासळत चालली आहे. या सगळ्यामुळे वडिलांना चिंता वाटली म्हणून त्यांनी पहाटे पाटोद्यात येत जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी वडील भावूक झालेले दिसून आले.
उपोषणाच्या १९ व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. डॉक्टरांनी रात्री तीन वाजता जरांगे यांची तपासणी केली. जिल्हा शल्य चिकित्सकांनी मनोज जरांगे यांची तपासणी करण्यास नकार दिला. आज सकाळपासून जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. मी मराठा समाजासाठी आंदोलन करतो आहे आणि मुंबईत एकटा जाणार अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे. मात्र मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला संमती दिलेली नाही. आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
