मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यात कुणबी समाजाची चार प्रमाणपत्रं रद्द झाल्याची माहिती समोर आल्यानंतर मनोज जरांगे हे आक्रमक झाले. माढा या ठिकाणी आयोजित सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत सरकारला थेट इशारा दिला. “मी समाजासाठी उपोषण करून जीव देऊ शकतो तशी वेळ पडली तर जीव घेऊही शकतो. मला त्या वाटेवर नेऊ नका,” असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.
मनोज जरांगेंनी माढा येथील सभेत काय इशारा दिला?
“मी समाजासाठी उपोषण करून जीव देऊ शकतो तशी वेळ पडली तर कोणाचा जीव घेऊही शकतो, त्यासाठी मी मागेपुढे बघणार नाही. पण मला त्या वाटेवर नेऊ नका” असं वक्तव्य करत मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे. माढ्यातील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीका केलीजरांगे म्हणाले की, मागचं वर्षभर मी देवेंद्र फडणवीसांना काही बोललो नाही. ज्या बावनकुळेंमुळे ते अडचणीत येतात तर त्यांनी असला कशाला सांभाळायचा? आता मी कोणाला सोडणार नाही. मराठा समाजाच्या अन्नात माती कालवणाऱ्या कोणालाही हा समाज माफ करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांवरही टीका
सोलापूर जिल्ह्यातील वैराग गावात बोलताना मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेना कितीही वळवळ करू द्या, यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही.” देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सुरुवात केली आहे, तर ज्या शिंदे साहेबांनी मराठ्यांना ५८ लाख नोंदी दिल्या, त्यांच्याच सांगण्यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी या नोंदी रद्द करण्याचा घाट घातला आहे, असा थेट आरोपही जरांगे यांनी केला.
