मराठवाड्यातील नवीन कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. त्यामुळे काही निवडून आलेले लोकप्रतिनिधी अडचणीत आले. १५ लाख रुपयांसाठी हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. अंतरवाली सराटीत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली. कुणाच्या आदेशाने कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले याचे नावच त्यांनी उघड केलं.

राज्य सरकारकडून कट शिजला आहे-जरांगे

मनोज जरांगे म्हणाले राज्यात सरकारकडून एक कट शिजला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांकडून कट शिजवला आहे. नोंदी त्यांनीच द्यायच्या आणि रद्द सुद्धा त्यांनीच करायचे असा हा कट आहे. मी एकटा पडलो पाहिजे म्हणून सरकारने जाणूनबुजून कट रचला असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. पुरेपूर आणि नियोजित कट सरकारकडून रचला गेला. मी सर्व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा केली.

..तर २०२९ ला बदला घेऊ

सरकार निवडून आलं आहे ते मराठ्यांमुळे, याच सरकारने मराठ्यांचा घात केला. आम्ही २०२९ ला या सगळ्याचा सर्वात मोठा बदला घेऊ. ज्योती शिंदे यांचं प्रमाणपत्र तुम्ही कायमचं रद्द करा हा आदेश कुणी दिला? प्रचंड गैरसमज निर्माण केला गेला. राजकीय द्वेषातून प्रमाणपत्र रद्द केलं. देवेंद्र फडणवीस तुम्ही विनाकारण मराठ्यांना अंगावर घेत आहात, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रद्द करायला सांगत आहेत. बावनकुळे हे काय फडणवीसांचे मालक झाले का? असा संतप्त सवाल मनोज जरांगेंनी केला. पुढे जरांगे म्हणाले यशवंता दहीहंडे यांची उर्दू मधील नोंद सापडली आहे. हीच नोंद ग्रामपंचायत मध्ये लावली. तुमचा(म्हणजे भाजपा)उमेदवार निवडून आला नाही म्हणून तुम्ही फोन करून नोंद रद्द करायला लावली, असा आरोप जरांगे यांनी बावनकुळे आणि फडणवीस यांच्यावर केला. मनोज जरांगे लोकप्रतिनिधींचे पुरावे दाखवताना संतप्त झाले. सरकारच्या एकाही अधिकाऱ्याकडे इतके पुरावे नसतील, तितके आज मी दाखवत आहे. बावनकुळे यांनी सांगितलं की नोंदी रद्द करा. त्यांनी endoncement करून पत्र दिलं असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला.

१५ लाख रुपये मागत असल्याचा आरोप आणि सरकारला इशारा

१५ लाख रुपये द्या म्हणतात, ऑफ द रेकॉर्ड बोलतात, असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी बावनकुळे यांच्यावर लावला. कुणबी प्रमाणपत्र हे केवळ १५ लाख रुपयासाठी रद्द करता का? असा सवाल त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे बावनकुळे यांच्या आडून राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. बावनकुळे असं वागणार असतील तर पुढच्या खेपेला मी १५ ते २० आमदार पाडून दाखवेन असा इशारा त्यांनी फडणवीस सरकारला दिला. सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून खोटे प्रयोग करून नुकसान करू नका असं आवाहनही मनोज जरांगेंनी केलं.