भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया नाशिकमध्ये रोवणाऱ्या चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचे योगदान अमूल्य आहे. नाशिक शहराला मंत्रभूमी, तंत्रभूमी अशी स्वत:ची ओळख असताना इतिहासकारांकडून या भूमीला हवे तसे महत्त्व दिले गेले नाही. सध्या सामाजिक सभ्यता लोप पावत चालल्याने त्याचे प्रतिबिंब विविध चित्रपटांमध्ये उमटत आहे. यामुळे दर्जाहीन चित्रपट निर्माण होत असल्याची खंत ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक मनोजकुमार यांनी व्यक्त केली.
येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित पाचव्या नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (निफ) मनोजकुमार यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. एक लाख रुपयांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. व्यासपीठावर ज्येष्ठ निर्माते किरण शांताराम, आ. बबन घोलप, संयोजक मुकेश कणेरी, प्रभावती कणेरी, अशोक लोखंडे उपस्थित होते.
आम्ही चित्रपट तयार करायचो तेव्हा समाज एकसंध होता. त्याला एक संस्कृतीचे अधिष्ठान होते. आज नेमके उलटे चित्र पाहायला मिळत आहे. निद्रिस्त असलेला समाज जेव्हा जागृत आणि एक होईल तेव्हा चित्र बदलेल, असा विश्वासही मनोजकुमार यांनी व्यक्त केला. अलीकडे पाश्चात्त्यांचे अनुकरण करणे वाढले आहे. विदेशींना मुजरा केला जातो, तर आपल्याकडील कलेला हवे तसे महत्त्व दिले जात नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या प्रसंगी किरण शांताराम यांनीही चित्रपटांच्या घसरत्या दर्जाबद्दल चिंता व्यक्त केली. फेस्टिव्हलमध्ये चांगले देण्याचा प्रयत्न करताना पूर्ण चित्रपट सादर करण्यास प्राधान्य द्यावे, असे सुचवितानाच नाशिकमधील फाळके स्मारक चांगल्या प्रकारे जपले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनातील उत्कृष्ट कलाकृतींना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.