अलिबाग – बकरी मारल्‍याच्‍या संशयातून खून करून तब्‍बल २१ वर्षे फरार असलेल्‍या आरोपीला पोयनाड पोलीसांनी पनवेल येथून मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. मनोज अशोक पांडव असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे.

ही खूनाची घटना २००४ साली अलीबाग तालुक्‍यातील घेरासागरगड वडवली येथे घडली होती. आरोपी मनोज पांडव याची बकरी वडवली गावात गणेश ठाकूर यांच्‍या आवारात मृतावस्‍थेत आढळून आली होती. प्रसाद ठाकूर यानेच आपली बकरी मारल्‍याचा संशय मनोज पांडव याला होता. त्‍यावरून मनोज याने प्रसाद ठाकूर याच्‍याविरोधात अलिबाग न्‍यायालयात केस दाखल केली होती. या प्रकरणातून दोघांमध्‍ये वैमनस्‍य निर्माण झाले. याच रागातून मनोज पांडव याने २ एप्रिल २००४ रोजी रात्रीच्‍या सुमारास प्रसाद ठाकूर याला एकटे गाठून त्‍याच्‍यावर धारदार शस्‍त्राने वार केले. या प्रकरणी गणेश ठाकूर यांच्‍या फिर्यादीवरून पोयनाड पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.

या गुन्‍हयातील एक आरोपी जयप्रकाश उर्फ जयेश म्‍हात्रे रा. उसर्ली याच्‍याविरोधात न्‍यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्‍यात आले आहे. परंतु या गुन्‍हयातील फरार आरोपी मनोज पांडव २१ वर्षे पोलीसांना गुंगारा देत होता. मात्र आता पोयनाड पोलीसांना त्‍याचा सुगावा लागला. तांत्रिक माहितीच्‍या आधारे मनोज पांडव याला पनवेल येथील राहत्‍या घरातून ताब्‍यात घेतले. त्‍याची चौकशी केली असता त्‍याने गुन्‍हयाची कबुली दिली. आरोपी मनोज पांडव यांला न्‍यायालयासमोर हजर केले असता न्‍यायालयाने त्‍याला २० मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोयनाडचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, हवालदार मंगेश लांगी, राकेश मेहतर, शिपाई किशोर चव्‍हाण यांच्‍या पथकाने ही कामगिरी पार पाडली.