गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र, संजय राठोड यांनी यांचा मंत्रीमंडळात समावेश केल्याने अनेकांकडून टीका होते आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही या निर्णयाला विरोध केल्यानंतर शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी चित्रा वाघ यांना एकत्र येऊन महिलांच्या सन्मानासाठी लढावे, असे आवाहन केले आहे. तसेच यासाठी तुमची तयारी आहे का? असेही त्यांनी चित्रा वाघ यांना विचारले आहे.

नेमकं काय म्हणाल्या मनिषा कायंदे?

“संजय राठोड यांना मंत्री केल्यामुळे चित्रा वाघ या प्रचंड अस्वस्थ झाल्या आहेत. त्यांनी आकाडतांडव सुरू केला आहे. मला त्यांना ए़ढंच विचारायचं आहे की राहुल शेवाळे असतील किंवा संजय राडोड असतील, याचं वस्रहरण करण्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी एकत्र येण्याची तुमची तयारी आहे का?”, असे शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी विचारले आहे.

“राठोड यांना मंत्रीपद देणं दुर्दैवी”

दरम्यान, संजय राठोड यांना मंत्रीपद दिल्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी विरोध केला आहे. राठोड यांना मंत्रीपद देणं दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राठोड यांनी शपथ घेतल्याच्या पुढल्याच मिनीटाला चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. “पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे,” असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. तसेच, “संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे,” असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.