सांगली : सहकारी साखर कारखानदारी टिकवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने साखरेचे किमान विक्री मूल्य वाढविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विश्वास सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंग नाईक यांनी बुधवारी केले.चिखली (ता. शिराळा) येथील विश्वास सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा रोलर पूजनाचा कार्यक्रम श्री. नाईक व उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते बुधवारी पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.
अध्यक्ष नाईक म्हणाले, केंद्र सरकारने उसाचा रास्त आणि किफायतशीर भाव (एफआरपी) प्रति क्विंटल ३४० रुपयांवरून ३५५ रुपये केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना उसाला चांगला दर मिळणार आहे. २०१९ मध्ये, एफ. आर. पी. प्रति क्विंटल २७५ रुपये होती. त्यानंतर सहा वेळा त्यात वाढ करण्यात आली. त्या तुलनेत साखरेच्या किमान विक्री किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. २०१९ पासून साखरेचा दर प्रति क्विंटल ३ हजार १०० रुपये आहे. या असमतोलामुळे सहकारी आणि खासगी कारखान्यांवर प्रचंड आर्थिक ताण येत आहे. स्थिर खर्च संरचना, वाढत्या कर्जाचा बोजा वाढत आहे.
ते म्हणाले, साखर कारखान्यांना साखर विक्रीतून मिळणारे उत्पन्न आणि वाढत्या एफ. आर. पी. किमतीची जुळणी करताना मोठी कसरत करावी लागत आहे. कारखाने वाढत्या प्रमाणात खेळत्या भांडवली कर्जावर अवलंबून आहेत. ज्यामुळे आणखी जोखीम आणि व्याज खर्च वाढत आहे. आधार यंत्रणेशिवाय, साखर कारखान्यांची दीर्घकालीन व्यवहार धोक्यात आहे. त्यासाठी साखरेची किमान विक्री किंमत आणि इथेनॉलच्या किमतीमध्ये प्रमाणबद्ध वाढ करण्याची गरज आहे. तरच सहकारी साखर कारखानदारी टिकणार आहे. येत्या हंगामात साडेसात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवून नियोजन केले आहे.
प्रारंभी कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमास संचालक विराज नाईक, सुरेश पाटील, विडास कदम, शिवाजी पाटील, संदीप तडाखे, विजय नलवडे, बाळासाहेब पाटील, बाबासो पाटील, यशवंत निकम, संभाजी पाटील, यशवंत दळवी, बिरुदेव आमरे, विश्वास पाटील व कोंडिबा चौगुले यांच्यासह सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी, सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.