लोकसत्ता प्रतिनिधी सांगली : कोकरूडच्या नेत्यांनी पाणी योजनांसाठी पाच वेळा निधी मंजूर करूनही नागरिकांना चार दिवसांतून एक वेळ पाणी कसे काय? असा सवाल करत आमदार मानसिंगराव नाईक यांनी अप्रत्यक्ष भाजपचे सत्यजित देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. कोकरूड (ता. शिराळा) येथे ग्रामपंचायत ते मटण मार्केट रस्ता काँक्रिटीकरण कामाचा आरंभ सोमवारी आ. नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक होते. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. नाईक म्हणाले, मी फक्त बोलत नाही. प्रत्यक्षात काम करून दाखवतो. ते वेळोवेळी सिद्ध केले आहे. निवडणूक आल्यावर मोठमोठी भाषणे करत नाही. सोशल मीडियाचा आधार घेऊन लपून टीकाही करत नाही. सन २००० पासून सार्वजनिक समाज व राजकारणात आल्यापासून अविश्रांत काम केले आहे. विश्वास व विराज उद्योग समूहात सातत्याने नवनवीन संस्थांची उभारणी केली आहे. अनेक बेरोजगार युवकांना काम दिले आहे. संस्थांचा वापर राजकारणासाठी केलेला नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ज्यांनी संस्था राजकारणासाठी वापरल्या, त्यांच्यावर संस्था विकण्याची वेळ आली. अशी टीकाही त्यांनी देशमुख यांचे नाव न घेता केली. आणखी वाचा-Devendra Fadnavis : “पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली, तर शरद पवारांना सुवर्णपदक मिळेल”; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका! स्व. शिवाजीराव देशमुख यांनी अखेरच्या सापर्यंत जातीयवादी शक्तींचा विरोध केला. आज त्यांच्या वारसदारांनी काँग्रेस वाऱ्यावर सोडून जातीयवादी पक्षाची साथ केली. देशमुख यांच्या विचारांना तिलांजली दिली. फक्त सत्ता व पदाच्या हव्यासापोटी त्यांचे कार्यकर्ते फरपटत जातीयवाद्याच्या दावणीला नेले. विश्वास साखर कारखान्याचे संचालक सुहास घोडे-पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी, यशवंत ग्लुकोजचे संचालक गजानन पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.