अंत्यविधीतील फुलांपासून खतनिर्मिती

स्मशानभूमीतील महापालिकेचे कर्मचारी जमा होणारी फुले एकत्र करून या यंत्रात टाकतात.

(संग्रहित छायाचित्र)

प्रकाश लिमये

‘केशवसृष्टी’च्या सहकार्याने मीरा-भाईंदर महापालिकेचा उपक्रम

स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतदेहांवर अर्पण करण्यात आलेले पुष्पहार, फुले एरवी कचऱ्यातच जात असतात. या फुलांचाही सदुपयोग करता येऊ शकतो हे सहजासहजी मानवणारे नाही. परंतु ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे मीरा-भाईंदर महानगरपालिकेने. केशवसृष्टी या अग्रगण्य संस्थेच्या सहकार्याने भाईंदर येथील स्मशानभूमीत फुलांपासून खतनिर्मिती हा उपक्रम महापालिकेने सुरू केला आहे.

अंत्ययात्रेसाठी येणारे लोक मृतदेहावर पुष्पचक्र, पुष्पहार तसेच फुले वाहून मृत व्यक्तीला आदरांजली वाहतात. मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना पुष्पहार बाजूला काढले जातात. स्मशानभूमीतच एका बाजूला ते ठेवले जातात. या पुष्पहारांशी, फुलांशी संबंधित व्यक्तींच्या भावना जोडलेल्या असल्याने ही फुले उघडय़ावर टाकली जात नाही. स्मशानभूमीतील कर्मचारी आपल्या पद्धतीने त्याची परस्पर विल्हेवाट लावत असतात. परंतु वाया जाणाऱ्या या फुलांचाही सदुपयोग करून त्यापासून खतनिर्मिती करणे शक्य आहे हे केशवसृष्टी या संस्थेने समाजमनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे.

संस्थेच्या वतीने मीरा-भाईंदर महापालिकेच्या सहकार्याने भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीत प्रायोगिक तत्त्वावर फुलांपासून खत तयार करणारे कम्पोस्टर यंत्र बसवण्यात आले आहे. स्मशानभूमीतील महापालिकेचे कर्मचारी जमा होणारी फुले एकत्र करून या यंत्रात टाकतात. फुलांपासून खत करण्यासाठी संस्थेने आवश्यक असलेले बायोकल्चरही दिले आहे. साधारणपणे पाच किलो फुलांसाठी एक चमचा इतके बायोकल्चर आवश्यक असते. या यंत्रामध्ये हे मिश्रण नीट मिसळून ते २१ दिवस ठेवले जाते. अधूनमधून कम्पोस्टर फिरविण्याचे काम महापालिकेचे कर्मचारी करतात. २१ दिवसांनंतर खत तयार झाले की ते स्मशानभूमीतील बगीच्यासाठी तसेच इतर उद्यानासाठी वापरण्यात येत आहे.

१३ स्मशानभूमीसाठी योजना

कचरामुक्त शहर हा केशवसृष्टीचा संकल्प आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर भाईंदर स्मशानभूमीत सुरू करण्यात आलेला हा उपक्रम यशस्वी ठरला तर शहरातील इतर १३ स्मशानभूमीतही कम्पोस्टर बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती केशवसृष्टी गोशाळेचे कार्यवाह आणि मीरा-भाईंदर महापालिकेच्या प्रभाग समितीचे सभापती डॉ. सुशील अग्रवाल यांनी दिली.

ग्रीन चळवळ

उत्तन येथील केशवसृष्टी या नामांकित संस्थेने पर्यावरण या विषयावर मोठय़ा प्रमाणावर कार्य हाती घेतले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून माय ग्रीन सोसायटी ही चळवळ संस्थेने सुरू केली आहे. कचऱ्यातून खतनिर्मिती हा या चळवळीचा मुख्य गाभा आहे. मोठय़ा उद्योगांच्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधीचा (सीएसआर फंड) वापर करून संस्थेने राज्यातील ६० मोठय़ा देवस्थानांना निर्माल्यापासून खत निर्माण करणारे कम्पोस्टर उपलब्ध करून दिले आहे. आता याच उपक्रमाचा एक भाग म्हणून भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीत कम्पोस्टर बसवण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Manufacturing of fertilizers from the flowers

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या