दिंडय़ांच्या आगमनाने शहर भक्तिमय; हरिनामाच्या गजराने दुमदुमले!

आज देवगड संस्थानची भास्करगिरी महाराजांच्या अधिपत्याखालील दिंडीचे आगमन झाले.

पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडी, पालख्यांचे नगरमध्ये आगमन होऊ लागल्याने हरिनामाच्या गजराने शहर दुमदुमून गेले आहे. रविवारी सायंकाळी भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखालील देवगडच्या दिंडीचे आगमन झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी टाळ वाजवत दिंडीत सहभागी झाले होते. (छाया- अनिल शहा, नगर)
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या विविध दिंडी, पालख्यांचे नगर शहरात आगमन होऊ लागल्याने वातावरण भक्तिमय झाले आहे. हरिनामाचा गजर, खांद्यावर भागवत धर्माचा ध्वज, टाळ-मृदुंगाचा ताल, डोक्यावर तुळशी वृंदावन, शिस्तीत चालणारे वारकरी यामुळे शहर दुमदुमून गेले आहे. पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. दरवर्षी नित्यनियमाने मार्गक्रमण करणाऱ्या या दिंडय़ांशी नगरकरांचे ऋणानुबंध जुळले गेले आहेत.
शहरातून जाणाऱ्या मनमाड, औरंगाबाद, पाथर्डी, कल्याण मार्गावरून अनेक दिंडय़ांचे नगरमध्ये आगमन होऊ लागले आहे. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ पालखी दिंडीचे दोन दिवसांपूर्वी आगमन झाले होते. ही दिंडी बाजार समितीत मुक्काम करून आज, रविवारी सकाळी मार्गस्थ झाली. आज देवगड संस्थानची भास्करगिरी महाराजांच्या अधिपत्याखालील दिंडीचे आगमन झाले. ती उद्या प्रस्थान करेल. धरणगाव (जळगाव) येथून निघालेल्या पायी दिंडीचेही काल आगमन झाले. महापौर सुरेखा कदम यांनी स्वागत केले. जखणगाव येथील दिंडीचेही आज मार्गक्रमण झाले. वीर हनुमान पायी दिंडीचे मंगळवारी मार्गक्रमण होणार आहे.
या दिंडय़ांचे नगरमध्ये आगमन झाल्यावर शहरातील अनेक नागरिक त्यात सहभागी होऊन पुढे रवाना होतात. या मार्गावरून पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीचे व्यवस्थापक वारकरी कोणत्या दिवशी, वेळी नगरला येणार याचे आगाऊ वेळापत्रकच येथील संस्था, संघटनांना, तरुण मंडळांना कळवतात, त्यानुसार येथील कार्यकर्ते या दिंडीतील वारकऱ्यांच्या मुक्कामाची, जेवणाची व्यवस्था करतात, यातून नगरकरांचे वर्षांनुवर्षांचे ऋणानुबंध तयार झाले आहेत. मुक्कामाच्या काळात वारकऱ्यांची बडदास्त ठेवली जाते. त्यांच्यासाठी स्वच्छतेची, औषधोपचाराची व्यवस्था केली जाते. आवश्यक ती मदतही केली जाते, यासाठी कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे पुढे येतात. दिंडी, पालखी सोहळय़ातून शेकडो वारकरी सहभागी असतात, परंतु सर्वाचीच व्यवस्था केली जाते.
नगरच्या मुक्कामात भजन, हरिपाठ, कीर्तन, रिंगण आदी सोहळे होतात, अनेक दिंडय़ांच्या वारकऱ्यांसाठी ड्रेसकोडही ठरवून दिला जातो, त्यामुळे वारकरी कोणत्या दिंडीतील आहेत, याची माहिती लगेच मिळते. या काळात शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत असल्याने चौकाचौकांत वाहतूक पोलिसांची आवश्यकता भासत असते. परंतु वाहतूक शाखेचे त्याकडे दुर्लक्ष झालेले जाणवते.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Many dindi yatra reaching in ahmednagar depart to pandharpur