एजाजहुसेन मुजावर, लोकसत्ता

सोलापूर : उदय उमेश लळित यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाचा शपथविधी सोहळा पाहताना सोलापूरकर  सुखावले. न्या. लळित यांच्या रूपाने सरन्यायाधीशपदाचा हा बहुमान सोलापूरला पहिल्यांदाच मिळाला आहे.  लळित घराणे तसे पाहता मूळचे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिर्ये-कोठारवाडीचे. परंतु शंभर वर्षांपूर्वी या घराण्यातील रंगनाथ ऊर्फ आण्णासाहेब लळित हे सोलापुरात आले आणि येथेच स्थायिक झाले. ते स्वत: निष्णात वकील होते. त्यांचे पुत्र उमेश, जयंत, सुभाष आणि आनंद यांनीही वकिली व्यवसायाचा वारसा चालविला.

Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
dharashiv, show of strength dharashiv
धाराशिवच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा
dhananjay mahadik statment about shoumika mahadik contesting poll from hatkanangale constituency
हातकणंगलेत शौमिका महाडिक यांच्यासाठी लढण्यास तयार – धनंजय महाडिक

उमेश लळित हे १९७४ ते १९७६ या कालावधीत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. त्यांचे पुत्र उदय आणि सुबोध हे तिसऱ्या पिढीतील आणि उदय यांचे पुत्र श्रीयश हे चौथ्या पिढीचा वकिली वारसा चालवत आहेत. न्या. उदय लळित यांचे आजोबा रंगनाथ लळित वकील यांनी, स्वातंत्र्यलढय़ात १९३० साली सोलापुरात मार्शल लॉ चळवळीत ब्रिटिश सैनिकांनी जो अमानुष अत्याचार केला होता, त्याबद्दल नुकसान भरपाईचे चार दावे न्यायालयात दाखल केले होते. ब्रिटिश सत्तेविरूध्द त्यांनी निर्भयपणे न्यायालयीन लढाई केली होती. 

न्या. उदय लळित यांचे शालेय शिक्षण सोलापुरात हरिभाई देवकरण प्रशालेत झाले होते. त्यांना वर्गात शिकविलेल्या निवृत्त शिक्षिका पुष्पा आगरकर  आपला विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाची शपथ घेताना त्या ऐतिहासिक सोहळय़ास आवर्जून उपस्थित होत्या. त्यांनी स्वत:ला धन्यता मानली. तर त्यांचे शालेय वर्गमित्र डॉ. अनिकेत देशपांडे, सागर भोमाज, सेबीचे मुख्य सरव्यवस्थापक असलेले सुरेश गुप्ता, सुरेश बांदल, अ‍ॅड. भगवान वैद्य व त्यांच्या पत्नी माणिक वैद्य यांनीही  हा शपथविधी सोहळा पाहिला. लळित कुटुंबीयांशी निगडित अ‍ॅड. पांडुरंग ऊर्फ रवी देशमुख यांनाही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. हा शपथविधी सोहळा आपणांसाठी आणि वर्गमित्र उदय लळित यांच्यासाठी जणू अमृत सोहळा होता, अशा भावना अ‍ॅड. भगवान वैद्य यांनी व्यक्त केल्या.

लळित कुटुंबीयांसाठी तर हा सोहळा विशेष आनंदाचा आणि सुखावह होता. विशेषत: सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर उदय यांनी प्रथम वडील न्या. उमेश लळित यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. सोलापुरात लळित कुटुंबीय भुईकोट किल्ल्याजवळ लकी चौकात स्वत:च्या वास्तूमध्ये अनेक वर्षे राहिले. लळित कुटुंबीयांचे सोलापूरच्या वकिली क्षेत्रासह सामाजिक, सांस्कृतिक, शिक्षण क्षेत्रात नेहमीच जिव्हाळय़ाचे संबंध राहिले आहेत. हिराचंद नेमचंद वाचनालयामध्ये रंगनाथ ऊर्फ आण्णासाहेब लळित वृत्तपत्र विभाग तसेच वकिलांसाठी आनंदराव लळित विधी ग्रंथ विभाग कार्यरत आहे. याच कुटुंबातील सविता लळित यांनी सेवासदन शिक्षण संस्थेची अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली. तसेच सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासह संचालक मंडळावरही त्यांनी काम पाहिले आहे.