supriya sule : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मराठा नेत्यांकडून केली जात आहे. तसेच यासंदर्भात विविध ठिकाणी राजकीय नेत्यांना भेटून त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्नही मराठा आंदोलकांकडून केला जातो आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट) शिवस्वराज्य यात्रेदरम्यान आयोजित सभेत मराठा आंदोलक थेट व्यासपीठांवर पोहोचल्याचं बघायला मिळालं. यावेळी त्यांनी आक्रमक होत सुप्रिया सुळे यांचे भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला. हेही वाचा Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं अजित पवारांबाबत मोठं विधान; म्हणाल्या, “भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह…” नेमकं काय घडलं? राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान आज लातूरच्या अहमदपूरमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाषण देण्यास सुरुवात करताच काही मराठा आंदोलकांनी व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला. अखेर सुप्रिया सुळे यांनी त्यांना व्यासपाठीवर बोलवत त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसेच त्यांचं निवेदन स्वीकारलं. यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच आक्रमक होत सुप्रिया सुळे यांचं भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला. हेही वाचा - लोकसभेच्या अपयशामुळेच लाडकी बहीण योजना, शिवस्वराज्य यात्रेत सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका मराठा आंदोलकांचं म्हणणं काय होतं? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने ( शरद पवार गट) त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांकडून करण्यात आली होती. लोकसभेत मराठा समाजाने महाविकास आघाडीला मदत केली. त्याचा फायदाही महाविकास आघाडीला झाला. आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय, हे तुम्ही स्पष्ट करावं. कारण सत्ताधारी आता तुमच्याकडे बोट दाखवत आहेत. सर्वपक्षीय बैठकीला तुमच्या पक्षाचे नेते अनुपस्थित होते. त्यामुळे याबाबत तुम्ही भूमिका जाहीर करावी, असे मराठा आंदोलकांनी म्हटलं.