मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगेंचं आंदोलन सुरुच आहे. सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे ही त्यांची आग्रही मागणी आहे. त्यासाठी त्यांनी सरकारला १३ जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षणासाठी उपोषण सुरु केलं आहे. त्यांना उद्देशूनही मनोज जरांगेंनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?

“आंतरवली सराटीमध्ये आमचं आंदोलन सुरु आहे. मी रुग्णालयातून चाकरवाडीला जाणार आहे आणि पुन्हा रुग्णालयात येणार आहे. मला इथून कुणीही जायला सांगितलेलं नाही. तसंच मी अशा गोष्टी ऐकतही नसतो.” असं जरांगे म्हणाले. तसंच लक्ष्मण हाकेंना उद्देशूनही त्यांनी महत्त्वाचं विधान केलं.

लक्ष्मण हाकेंबाबत काय म्हणाले जरांगे?

“लक्ष्मण हाकेंचं बेमुदत उपोषण सुरु आहे. हाके आंदोलन करत आहेत म्हटल्यावर सरकारी शिष्टमंडळ येणारच. आंदोलन केलं म्हटल्यावर यावंच लागणार. मात्र दोघांचीही सारखीच फजिती होणार आहे लक्षात ठेवा. सरकारने १५ ते २० वर्षे आम्हाला फसवलं आहे. आजपर्यंत आम्हाला पाणी पाजत होते, आता तु्म्हाला पाणी पाजतील” असा सावधगिरीचा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

हे पण वाचा- Manoj Jarange on Girish Mahajan: सगे सोयऱ्यांबद्दलचं ‘ते’ विधान; जरांगेंचा गिरीश महाजनांना उलट सवाल

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालं. या शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, अतुल सावे यांचा सहभाग आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून शिष्टमंडळ जालन्याकडे रवाना झाले. हे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे जाऊन लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे. या भेटीत काय घडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र त्याआधीच त्यांना सावध राहण्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

चार महिन्यांनी काड्या करणाऱ्यांना घरी पाठवणार

आणखी चार महिन्यांनी काड्या करणाऱ्यांना घरी पाठवणार, १०० टक्के घरी पाठवणार. आम्ही आता रडत बसणार नाही. असं म्हणत त्यांनी सरकारलाही इशारा दिला. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा ही आमची मुख्य मागणी आहे. आम्ही आता आंदोलन करणार नाही येत्या निवडणुकीत २८८ उभे करु किंवा २८८ जणांना पाडू असंही जरांगे म्हणाले.

गुरुवारी काय म्हणाले होते जरांगे?

“मराठा आणि कुणबी एकच आहेत. आम्ही आमचं हक्काचे आरक्षण मागतो आहे ते आम्हाला द्या. सगे सोयरे आरक्षण देऊन ते उडवण्याचा सरकारचा डाव आहे आणि ते उडवलं जातं आहे. सरकार आरक्षण देणार आणि तेच आरक्षण देणार आहे. आरक्षण देण्याच्या आधीच याचिका दाखल झाली होती. पुन्हा मराठ्यांना गोड बोलून डाव साधण्याचा हा डाव आहे. आरक्षण ओबीसीतून घेणार अन्यथा २८८ उभे करू नाहीतर २८८ जणांना पाडू. मराठ्यांचं आरक्षण टिकू न देण्याची तयारी गिरीश महाजन यांनी केली आहे.” असं मनोज जरांगेंनी म्हटलंय.