मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरात १ ऑगस्टपासून लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. तर २ ऑगस्टला पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. अशी माहिती क्रांती मोर्चाचे समन्वय शांताराम कुंजीर यांनी दिली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आठवड्याभरापासून राज्यातील ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.या काळात ७ जणांनी आत्महत्या केल्या आहेत.हे लक्षात घेता आत्महत्येचे पावले उचलू नये.असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्यात येतील.असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.  मात्र अजूनही गुन्हे मागे घेण्यात आले नाही.त्यामुळे सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. ते पुढे म्हणाले की, चाकण येथे झालेल्या हिंसक आंदोलनाचा मराठा क्रांती मोर्चाशी संबध नसून आंदोलनात परप्रांतीयांसह काही जण घुसले होते.अशा कृतीतून मराठा आंदोलनाला बदनाम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच ठिय्या पद्धतीने शांततेत आंदोलन करावे. मालमत्तेचे नुकसान होता कामा नये.असे आवाहन त्यांनी केले.