Manoj Jarange Patil Hunger Strike Calls Off: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पहाटे २० दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सोडले. सरकारच्या शिष्टमंडळाने बीडमधील पाटोदा येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांची मनधरणी केली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार सुरेश धस, आमदार प्रसाद लाड आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. यानंतर सकाळी ६ वाजता पत्रकार परिषद घेऊन उपोषण सोडल्याची घोषणा करण्यात आली. मुंबईत गेलेल्या आंदोलकांनी परत यावे, असेही आवाहन त्यांनी केले.

सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला. या काळात मागण्या पूर्ण न केल्यास आम्ही मुंबई गाठणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. उपोषण आज स्थगित करत असलो तरी आंदोलन सुरूच राहणार, असेही मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

‘ही शेवटची फसवणूक समजू’

मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या समर्थकांना आवाहन करताना म्हणाले, “तीन वर्षांपासून आपण आरक्षणासाठी लढत आहोत. आता सरकारला आणखी तीन महिने देऊ. तीन वर्ष तीन महिने आपण लढत आहोत, असे समजू. सरकारवर आपण विश्वास ठेवत असलो तरी हे आंदोलन सुरूच राहणार आहे. ९० दिवस थांबलो तरी काहीही फरक पडणार नाही. आपण ही शेवटची फसवणूक समजू. सरकारला हे तीन महिने शेवटचे देऊ.”

‘५८ लाखांपैकी एकही नोंद कमी व्हायला नको’

उपोषण मागे घेण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही आंदोलन केल्यामुळे मराठा समाजाच्या ५८ लाख कुणबी नोंदी आढळून आल्या होत्या. या नोंदी कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत होता. या आंदोलनामुळे ते काम थांबले. दुसरा मुद्दा म्हणजे, हैदराबाद गॅझेटियरचा सुधारित शासन निर्णय काढण्यास सरकार तयार झाले आहे.

सरकारची मग्रुरी मोडणे गरजेचे होते

कधी कधी मोठी उडी घेण्यासाठी दोन पावले मागे यावे लागते, असेही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले. मराठ्यांकडे आम्ही जाणार नाही, शिष्टमंडळ पाठवणार नाहीत, ही मग्रुरी आणि मस्ती मोडणे खूप गरजेचे होते. समाजापुढे सरकारने वाकणे गरजेचे होते, ते या आंदोलनातून मी केले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्यासाठी निघालेले असताना पाटोदा येथे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे पाटोदा येथे विठ्ठल मंदिराच्या भक्तनिवासमध्ये त्यांना सलाईन लावण्यात आले. अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर, १२ सप्टेंबरपासून त्यांनी सलाईन घेणे बंद केले होते. त्यांना हात-पाय हलवणे देखील कठीण झाले होते. त्यामुळे त्यांनी उपचार घ्यावेत, अशी मागणी मराठा समाजातील आंदोलक करत होते.