Maratha Reservation: संभाजीराजेंसमोर जर काही भूमिका मांडायची असेल तर ती मी पुण्यात मांडेन – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटलांनी दिला संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा

Maratha Reservation, BJP, Chandrakant Patil, Chhatrapati Sambhajiraje, Kolhapur
चंद्रकांत पाटलांनी दिला संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा

मराठा आरणक्षासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या मूक आंदोलनास सुरुवात झाली आहे. कोल्हापुरात संभाजीराजेंच्या नेतृत्वात सुरु असलेल्या मूक आंदोलनाला समर्थन देण्यासाठी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. काळे कपडे आणि काळा मास्क परिधान करत यावेळी मराठा आरक्षणाची मागणी करत निषेध नोंदवला जात आहे. दरम्यान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील पोहोचले होते. यावेळी त्यांनी संभाजीराजेंकडे निवेदन देत आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळावं यासाठी तसंच आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत आधीच्या सरकारने दिलेल्या सवलती सुरु करण्यासाठी जे आंदोलन, प्रयत्न करतील त्या सर्वांसोबत भाजपा बिल्ला न लावता आहे. त्यामुळे संभाजीराजेंनी जे आंदोलन सुरु केलं आहे त्यात आम्ही सर्व सहभागी झालो आहोत”.

खासदारकी मागायला भाजपाकडे गेलो नव्हतो; संभाजीराजेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

“मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा असेल,” असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. “५ जुलैपासून विधानसभा आणि विधानपरिषद अधिवेशन आहे, त्याआधी राज्यातील लोकप्रतिनिधींना अशाप्रकारे बोलतं करणं उपयोगी राहील. यामुळे पहिल्याच दिवशी मराठा आरक्षणाला दिलेल्या सवलती तातडीने सुरु करा आणि आरक्षण मिळण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरु करा असं सगळ्या लोकप्रतिनिधींनी म्हटलं पाहिजे,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मी या ठिकाणी कोल्हापूरचा नागरिक म्हणून आलो आहे सांगताना त्यामुळे संभाजीराजेंसमोर जर काही भूमिका मांडायची असेल तर ती मी पुण्यात मांडेन अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maratha reservation bjp chandrakant patil chhatrapati sambhajiraje protest in kolhapur sgy