मराठा समाजाला आरक्षण देण्याची तुमची कधीच इच्छा नव्हती; चंद्रकांत पाटील यांची पवारांवर टीका

“या प्रकरणात केंद्र सरकारची कोणतीच भूमिका नव्हती”

मराठा आरक्षणाच्या अमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर राज्यात राजकीय आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी अध्यादेश काढण्याचा पर्याय सूचवला आहे. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. “शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही. ते ५० वर्षांपासून राजकारणात असताना मराठा आरक्षण का दिलं नाही?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे सोपवताना आरक्षणाच्या अमलबजावणीस तूर्तास स्थगिती दिली. त्यामुळे शैक्षणिक व नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मुद्दा पुढे आला आहे. त्यावरून विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका केली जात आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यादेश काढण्याचा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश हे उत्तर असू शकत नाही – चंद्रकांत पाटील

‘एबीपी माझा’शी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले,”शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही. ते ५० वर्षांपासून राजकारणात असताना मराठा आरक्षण का दिलं नाही. सलग १५ वर्षात राज्यात तुमचं सरकार होतं. तुम्ही स्थापन केलेल्या बापट समितीने मराठा समाजाला मागास म्हटलं होतं. यावर मतदान झालं, पण त्यात फेटाळण्यात आलं. १५ वर्षात मराठा आरक्षण दिलं नाही. लोकसभेत पराभूत झाल्यानंतर घाईघाईने विधानसभा निवडणुकीआधी राणे समितीच्या आधारावर आरक्षण दिलं. ते न्यायालयात टिकलं नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छा तुमची कधीच नव्हती. जर होती तर याआधी द्यायला हवं होतं. आता भाजपाने दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर तुम्ही अध्यादेश काढायला निघालात, हे म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसल्यासारखं आहे,” अशी टीका पाटील यांनी पवारांवर केली.

आणखी वाचा- “जोपर्यंत श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता असेल, तोपर्यंत गरीब मराठ्यांना ना सत्ता मिळणार ना आरक्षण”

“या प्रकरणात केंद्र सरकारची कोणतीच भूमिका नव्हती. केंद्र सरकार पक्ष नव्हते. हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं असतं, पण सरकारने काय पूर्वतयारी केली? वकिलांमध्ये समन्वय नव्हता. आता फसवणूक थांबवा, अध्यादेशात वेळ जातो. १० टक्के आरक्षणाला हे पात्र आहेत, अशा आशयाचं सर्क्युलर ताबडतोब काढा, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maratha reservation chandrakant patil sharad pawar maharashtra bmh

ताज्या बातम्या