मराठा आरक्षण प्रश्न महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपाचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी रायगडपासून पुन्हा राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणा केलीय. “राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतर काहीही केलं नाही. सारथी सोडलं तर इतर मुद्द्यावर दिलेलं आश्वासन राज्य सरकारने पाळलं नाही,” अशी टीका संभाजीराजे यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना केलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२५ ऑक्टोबरपासून मराठा आरक्षणासाठी दौरा काढला जाणार आहे, असं सांगतानाच राज्य सरकार राज्याची जबाबदारी पाळत नाही, असा आरोपही संभाजीराजेंनी केलीय. “सरकारला अल्टिमेटम दिलं होतं पण त्यानंतर त्यांनी आश्वासनं पाळली नाहीत. त्यामुळे आता चर्चेला जाण्याचा विषयच नाही, आता आणखी काय चर्चा करायची?,” असा प्रश्न संभाजीराजेंनी उपस्थित केलाय.

“शिक्षणामध्ये ओबीसीप्रमाणे आरक्षण द्या म्हटलं ते सुद्धा काही केलं नाही. २५ ऑक्टोबरपासून सोलापूर, पनवेल, रायगडपासून उस्मानाबाद, धाराशीव अशा काही जिल्ह्यांमध्ये आम्ही दौरे करणार आहोत,” असं संभाजीराजे म्हणाले आहेत. तसेच “अनेकदा मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. नांदेडच्या सभेनंतरही मी पत्र लिहिलं होतं. नुसतं कोव्हिडचं कारण सांगायचं आणि पुढे ढकलायचं हे चालणार नाही. आमचे दौरे पुन्हा एकदा सुरु होणार आहेत,” असा इशाराच संभाजीराजेंनी सत्ताधाऱ्यांना केलाय.

“मराठा आरक्षणप्रश्नी मराठा आरक्षण उपसमितीने लक्ष घालणं गरजेचं आहे. चर्चेला जाण्याचा विषयच नाही. जे काही आहे ते मी आधीच सांगितलं आहे. त्यांच्या पुढे मी मुद्दे मांडले आहेत त्यावर त्यांनी उत्तरं शोधावीत. सारखं आक्रमक आक्रमक म्हणजे नुसतं काठी हातात घेणं आणि मोठ्यानं बोलणं म्हणजे आक्रमक नाही. मी आक्रमच आहे. तो आक्रमकपणा तुमच्या बॉडी लँग्वेजमधूनही दिसतो. तो दिसेलच आता,” असंही संभाजीराजे म्हणाले आहेत.

“अल्टीमेट दिल्यानंतर थोड्या गोष्टी झाल्याच. पत्रव्यवहाराला उत्तर नाही, सकारात्मक कारवाई नाही तर परत आता दौरे सुरु करायला पाहिजेत,” असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे. “आरक्षण देणं ही राज्य आणि केंद्र सरकार दोघांचीही जबाबदारी आहे. मी माझी भूमिका संसदेमध्ये मांडलीय. आता मागास्वर्गीय आयोग स्थापन करुन आरक्षण सुनिश्चित करणे ही एकमेव जबाबदारी राज्य सरकारीच आहे. तुम्ही सामाजिक मागास घोषित करण्यासाठी काय तयारी केलीय? असा माझा प्रश्न आहे या सरकारला,” असंही संभाजीराजे म्हणालेत.

“टीकाकारांना विनंती आहे त्यांनी आपला वेळ समाजासाठी द्यावा. सातारा गादी आणि कोल्हापूरची गादी मध्ये कोणताही मतभेद नाही. उदयनराजे नेमकं काय म्हटले हे मला माहित नाही,” असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं आहे. मराठा आरक्षणाची मशाल चुकीच्या व्यक्तीच्या हातात असल्याची टीका उदयनराजे यांनी केली होती. त्यावरुनच संभाजीराजेंना हा प्रश्न विचारण्यात आलेला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha reservation chatrapati sambhaji raje says if government does not take decision now we will be starting our campaign soon scsg
First published on: 13-10-2021 at 12:23 IST