लातूरमध्ये मराठा आरक्षणासाठी आठ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

लातूरमधील औसा तालुक्यात टाका येथे आठ जणांनी मराठा आरक्षणासाठी मंगळवारी सकाळी तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला

(संग्रहित छायाचित्र)

लातूरमधील औसा तालुक्यात टाका येथे आठ जणांनी मराठा आरक्षणासाठी मंगळवारी सकाळी तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी आठही तरुणांना ताब्यात घेतले आहे.

टाका येथे मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीवरुन आक्रमक पवित्रा घेतला. आरक्षण द्यावे अन्यथा तहसील कार्यालयात आत्मदहन करु असा इशारा आंदोलकांनी दिला होता. त्यासंदर्भातील निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास आंदोलक तहसील कार्य़ालयात घोषणाबाजी करत पोहोचले. मात्र, पोलिसांनी तहसील कार्यालयात चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलकांनी अंगावर केरोसिन ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अजित शिंदे, रमेश शिंदे, राजकिरण साठे, चेतन गोरे, रविकांत पाटील, जगदीश शिंदे, विलास शिंदे, शेषेराव सावंत अशी या ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची नावे आहेत.

पोलिसांनी औसा, भादा आणि किल्लारी या भागातील पोलीस ठाण्यातून अतिरिक्त कुमक मागवली होती. तहसील कार्यालयात सकाळपासूनच चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maratha reservation demand protest in latur