सुहास बिऱ्हाडे, वसई

मराठा आरक्षणासाठी मुंबई, ठाणे, रायगडमध्ये बंदची हाक देण्यात आली असून ठिकठिकाणी मराठी आंदोलकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. नालासोपाऱ्यातील मराठा संघटनेच्या आंदोलनात मात्र परप्रांतीयांनी घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

काकासाहेब शिंदे या आंदोलकाच्या मृत्यूनंतर मराठा आंदोलनाचे स्वरूप तीव्र झाले असून बुधवारी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या भागांमध्ये बंदची हाक देण्यात आली. या बंदचे पडसाद नालासोपारा येथेही उमटले. मात्र, या आंदोलनात परप्रांतीयांनी घुसखोरी केल्याचे समोर आल्याने तर्कवितर्कांना उधाण आले. नालासोपारा उड्डाण पुलावर बुधवारी दुपारी आंदोलन सुरू होते. जोराजोरात घोषणा सुरू होत्या. जमावातील दोन तरुण पोलिसांचे ऐकत नव्हते. त्यांचा जोश कायम होता. मात्र, त्या दोन तरुणांच्या भाषेवरुन पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांना हटकले असता यातील एकाने त्याचे नाव ‘चौहान’ असे सांगितले. तर दुसऱ्याने ‘पवन पांडे’ असे नाव सांगितले. शेवटी पोलिसांनी त्या दोघांनाही बाहेर काढले.

‘चौहान’ आणि ‘पांडे’ हे दोघे या मोर्चात का घुसले, याची नंतर चौकशी करु, असे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र, या दोन परप्रांतीयांनी थेट मराठा आंदोलनात घुसखोरी केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी देखील मोर्चात घुसखोरी झाली आहे का, याबाबत सूचक विधान केले. ‘आत्तापर्यंत मराठा आरक्षणासाठी लाखो नागरिकांच्या उपस्थितीत असंख्य मोर्चे निघाले. मात्र, यावेळी मोर्चाला हिंसक वळण लागले. या मोर्चात काही घुसखोर आहेत का, याचा तपास करावा लागेल, पण त्यासंदर्भात सध्या अधिक भाष्य करणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले.