मराठा आरक्षणावरून राज्य सरकार आणि मराठा आंदोलकांमध्ये पुन्हा एकदा मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारवर अत्यंत गंभीर आणि थेट शब्दांत हल्लाबोल केला आहे. आंदोलनाच्या सुरुवातीपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मवाळ भूमिका घेणाऱ्या जरांगे पाटलांनी आता पहिल्यांदाच शिंदेंना लक्ष्य करत, “तुमच्यावर लागलेला गद्दारीचा डाग मराठ्यांमुळेच पुसला गेला, हे विसरू नका!” अशा शब्दांत सुनावले आहे.
“एकनाथ शिंदे डबल गेम खेळतायत”
अंतरवाली सराटी येथे कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलेल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केले.
“आम्हाला एकनाथ शिंदे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. ते सतत डबल ढोलकी वाजवत आहेत. भुमरेंसारख्या नेत्यांसाठी मराठा समाजाच्या पोरांनी आपल्या जिवाचे रान केले. मग आमच्या या उपकारांची परतफेड तुम्ही अशी करणार का? शिंदे साहेब, तुम्ही मराठ्यांशी ‘डबल गेम’ खेळू नका. आमच्यावर ‘उद्धव ठाकरे बरे होते’ असं म्हणण्याची वेळ आणू नका,” असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला. यादरम्यानच मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगेंना फोन केला. त्यांच्यात चर्चा सुरू असताना, “एकनाथ शिंदे साहेबांना मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो,” असे विधान जरांगेंनी केले.
मंत्रालयातून शिजतोय मराठ्यांविरोधात कट
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यापासून रोखण्यासाठी आणि आपल्याला वैयक्तिकरीत्या सामाजिक व राजकीय पातळीवर एकाकी पाडण्यासाठी मंत्रालयातून नियोजित षड्यंत्र रचले जात असल्याचा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केला.
- मंत्र्यांचे षड्यंत्र: “देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील काही प्रमुख मंत्री कालपासून हा कट शिजवत आहेत. संजय शिरसाट यांनी जे केले ते एकनाथ शिंदेंच्या संमतीशिवाय शक्य नाही.”
- सदाभाऊ अन् बावनकुळे लक्ष्य: “बावनकुळे यांनी ‘सध्या तात्पुरते प्रमाणपत्र द्या आणि नंतर रद्द करा’ असा सल्ला दिल्याची चर्चा आहे. फडणवीस यावर शांत आहेत, याचा अर्थ त्यांची याला मुकसंमती आहे. बावनकुळे काय फडणवीस यांचे मालक झाले आहेत का?”
- पुरावे मांडणार: “सरकार मराठा समाजाचा कसा घात करत आहे आणि मला कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे मी लवकरच पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवेन.”
“२०२९ मध्ये मराठे सर्वात मोठा बदला घेणार!”
आंदोलनादरम्यान निजामकालीन नोंदी सापडूनही आणि रीतसर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असतानाही मराठा बांधवांची कुणबी प्रमाणपत्रे रद्द केली जात असल्याचा दावा जरांगे यांनी केला. मराठा समाजाच्या मतांवर निवडून यायचे आणि नंतर त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसायचा, हे या सरकारचे धोरण बनले आहे, असा टोला त्यांनी लगावला.
“मी खूप खुनशी आहे, एकदा का कुणी डोक्यात गेलं तर मी सोडत नसतो. मी कुणाचा मिंधा नाही आणि जेलमध्ये जायलाही घाबरत नाही. मराठ्यांच्या जीवावर सत्तेवर आलेले हे सरकार जर मराठ्यांचे वाटोळे करणार असेल, तर याद राखा २०२९ च्या निवडणुकीत मराठा समाज या सगळ्याचा सर्वात मोठा बदला घेईल,” असा आक्रमक इशारा देत जरांगेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून तीव्र संघर्षाचे संकेत दिले आहेत.
